
मुंबई : राज्याच्या राजकीय आणि आर्थिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण मानले जाणारे विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. २३ फेब्रुवारी ते २५ मार्च या कालावधीत हे अधिवेशन पार पडणार असून, ६ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करण्यात येणार आहे.
यंदाचा अर्थसंकल्प काहीसा वेगळ्या आणि भावनिक पार्श्वभूमीवर सादर होणार आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः राज्याचा अर्थसंकल्प सभागृहात मांडणार आहेत. त्यामुळे या अधिवेशनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाचा कालावधी आणि कार्यक्रम निश्चित करण्यात आला. या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच सर्व पक्षांचे गटनेते उपस्थित होते.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणानंतर कोणतेही शासकीय कामकाज न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही सभागृहांत शोकप्रस्ताव संमत करण्यात येणार असून, त्या वेळी सर्व पक्षांच्या गटनेत्यांना तसेच प्रत्येकी तीन सदस्यांना सभागृहात भावना व्यक्त करण्याची संधी दिली जाणार आहे.
दरम्यान, आगामी अर्थसंकल्पात राज्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा, विकासकामांसाठी तरतुदी, शेतकरी, महिला, युवक आणि पायाभूत सुविधांसंदर्भातील घोषणा याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या अधिवेशनात अनेक महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








