
नागपूर : जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यात येणाऱ्या कांद्री नगर पंचायतीत विकासकामांच्या नावाखाली गंभीर गैरव्यवहार झाल्याचा आरोप समोर आला आहे. भाजप पदाधिकाऱ्यांनी बांधकाम सभापती अतुल हजारे यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या रस्तानिधीचा दुरुपयोग करून केवळ स्वतःच्या बिअर बारपर्यंतच डांबरी रस्ता बांधल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कांद्री धन्यवाद गेट येथील रेल्वे क्रॉसिंगपासून निमखेडा गावापर्यंतच्या पांधन रस्त्याच्या डांबरीकरणासाठी तब्बल ७ कोटी ५९ लाख ५३ हजार ३८७ रुपये मंजूर करण्यात आले होते. मात्र, भाजप कन्हान मंडळाचे महामंत्री सचिन वासनिक आणि उत्तर भारतीय अध्यक्ष शिवगोपाल यादव यांनी आरोप केला आहे की, या निधीचा वापर सार्वजनिक हितासाठी न करता केवळ बांधकाम सभापती अतुल हजारे यांच्या बिअर बारपर्यंतच सुमारे ७५० मीटर रस्ता डांबरीकरण करण्यात आला.
आरोपानुसार, संबंधित रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, त्यामुळे सरकारी निधीची उघड उघड नासाडी झाली आहे. संपूर्ण गावाला लाभ होणे अपेक्षित असताना रस्ता केवळ वैयक्तिक फायद्यासाठी वळविण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
या सर्व प्रकरणात मोठ्या प्रमाणात धांदल झाल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
दरम्यान, या गंभीर आरोपांबाबत बांधकाम सभापती अतुल हजारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्यामुळे या प्रकरणावरून स्थानिक राजकारणात चांगलाच तापलेला माहोल निर्माण झाला आहे.








