
नागपूर– नागपूरच्या रामनगर कॉलनी परिसरात सोमवारी सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास एका घरातून बाहेर पडलेला अजगर साप दिसून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. रस्त्याने जाणारे नागरिक आणि आजूबाजूच्या कॉलनीतील रहिवासी साप पाहून भीतीने घाबरले, तर काही वेळातच घटनास्थळी मोठी गर्दी जमली आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेची माहिती मिळताच नागपूरमधील सेमिनरी हिल्स परिसरातील प्रसिद्ध वन्यजीव रेस्क्यूअर तसेच वाइल्ड अॅनिमल्स अँड नेचर हेल्पिंग सोसायटीचे अध्यक्ष शुभम जी.आर. तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी कोणतीही घबराट न करता अत्यंत धैर्याने आणि कौशल्याने अजगर सापाला सुरक्षितपणे पकडले. नागरिकांच्या सुरक्षिततेसह सापालाही कोणतीही इजा होऊ नये, याची विशेष काळजी घेण्यात आली.
रेस्क्यू करण्यात आलेला हा साप इंग्रजीत ‘इंडियन रॉक पायथन’ तर हिंदीत ‘अजगर’ म्हणून ओळखला जातो. रेस्क्यू कारवाईनंतर या संरक्षित प्रजातीच्या सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात जंगलात सुरक्षितपणे सोडण्यात आले.
या धाडसी आणि संवेदनशील कार्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला असून, शुभम जी.आर. यांच्या वन्यजीव संरक्षण कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.








