
नागपूर : गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बैद्यनाथ चौक ते मध्यवर्ती बसस्थानक (सीबीएस) दरम्यानच्या रस्त्यावर झालेल्या हिट-अँड-रन अपघातात एका अज्ञात पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
ही घटना ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. सुमारे ३५ वर्षांचा एक पुरुष रस्त्याने चालत असताना अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी होऊन बेशुद्ध अवस्थेत पडला. परिसरातील नागरिकांनी तात्काळ त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. त्याचा वर्ण सावळा असून चेहरा गोल, अंगकाठी मजबूत आणि उंची सुमारे ५ फूट ६ इंच आहे. त्याचे केस काळे असून दाढी व मिशी विरळ आहेत. मृताच्या अंगात काळ्या रंगाचा टी-शर्ट व निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट होती. विशेष म्हणजे दोन्ही हातांवर “जितेंद्र” (Jitendra) असे नाव गोंदलेले (टॅटू) आहे.
या प्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अपघातास कारणीभूत वाहनाचा शोध सुरू आहे. सदर वर्णनाशी जुळणाऱ्या व्यक्तीबाबत कुणाला माहिती असल्यास किंवा बेपत्ता व्यक्तीचा शोध घेत असलेल्या नातेवाइकांनी गणेशपेठ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पुढील तपास सुरू आहे.








