
मुंबई : अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा रंगली आहे. या संपूर्ण घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी पहिल्यांदाच थेट भूमिका मांडली आहे.
विमान अपघातानंतर राजकीय अस्वस्थता-
मुंबईहून बारामतीकडे प्रचारासाठी जात असताना अजित पवार यांच्या विमानाला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत विमानातील कोणीही वाचले नाही. अजित पवार यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून, या घटनेबाबत विविध तर्क-वितर्कही व्यक्त केले जात आहेत. अजित पवार आता आपल्यात नाहीत, यावर अनेकांना अजूनही विश्वास बसत नसल्याचे चित्र आहे.
राष्ट्रवादीत विलिनीकरणाच्या चर्चांना उधाण-
या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये पुन्हा एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू झाल्याचे दावे समोर आले. शरद पवार यांनी स्वतः कबूल केले की, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात पक्ष एकत्र येण्यावर चर्चा झाली होती. मात्र, अजित पवार गटातील नेत्यांनी अशा कोणत्याही चर्चेचे खंडन करत, याबाबत आम्हाला काहीही माहिती नव्हती, असे स्पष्ट केले.
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर मौन-
अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या काही तासांत सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. या निर्णयामुळे पवार कुटुंबातील मतभेदही उघड झाल्याची चर्चा आहे. शरद पवार यांनी यापूर्वीच सुनेत्रा पवार शपथ घेणार असल्याची कोणतीही माहिती आपल्याला दिली नव्हती, असे संकेत दिले होते.
नुकत्याच झालेल्या माध्यमांशी संवादात सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत प्रश्न विचारण्यात आला असता शरद पवार यांनी स्पष्ट शब्दांत, “मला याबाबत काहीही बोलायचे नाही,” असे सांगत प्रतिक्रिया देणे टाळले.
भारत-चीन सीमेवर संसदेत चर्चेची गरज-
याच संवादात शरद पवार यांनी भारत-चीन सीमेवरील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. या संवेदनशील मुद्द्यावर संसदेत सखोल चर्चा होणे आवश्यक होते, असे मत त्यांनी मांडले. राहुल गांधी यांनी संसदेत केलेल्या वक्तव्यांनंतर निर्माण झालेल्या वादावरही त्यांनी आपली संयमित भूमिका स्पष्ट केली.








