
नागपूर: भारतीय जनता पार्टीने नागपूर महानगरपालिकेत महिला सक्षमीकरणाचा नवा आदर्श ठेवत ‘मातृशक्ती’ला सत्तेची सूत्रे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी महिला उमेदवारांच्या नावांची घोषणा केल्यानंतर,आता स्थायी समिती अध्यक्षपदही महिलेलाच देण्याचे भाजपने निश्चित केले आहे.या निर्णयानुसार,प्रभाग २८ च्या नगरसेविका नीता ठाकरे यांनी महापौर पदासाठी, तर प्रभाग २९ च्या नगरसेविका लीला हातीबेड यांनी उपमहापौर पदासाठी आज आपले उमेदवारी अर्ज सादर केले.
भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी ११:०० वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात भाजप नगरसेवक गटाची अधिकृत नोंदणी करण्यात आली,त्यानंतर दुपारी २:०० वाजता महानगरपालिकेत विधीवत अर्ज दाखल करण्यात आले.नागपूर महानगरपालिकेत भाजपच्या एकूण ५५ महिला नगरसेविका निवडून आल्या आहेत.
विशेष म्हणजे, देशाचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केल्यानंतर लगेचच नागपुरात हा निर्णय घेतल्याने,भाजप आपल्या ‘लाडक्या बहिणींच्या’ सन्मानासाठी आणि सक्षमीकरणासाठी सदैव तत्पर असल्याचे अधोरेखित झाले आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात सविस्तर चर्चा करून हा धोरणात्मक निर्णय घेतला आहे.
लवकरच स्थायी समिती अध्यक्षांच्या नावाची घोषणा केली जाईल, अशी माहिती दयाशंकर तिवारी यांनी दिली.अर्ज सादर करतांना सर्व नगरसेवक,आमदार प्रवीण दटके, आमदार मोहन मते, आमदार कृष्णा खोपडे, माजी आमदार अनिल सोले, माजी आमदार गिरीश व्यास, सत्तापक्ष नेता बाल्या बोरकर,महामंत्री श्रीकांत आगलावे,रितेश गावंडे,विष्णू चांगदे यांसह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








