
नागपूर – रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) आपल्या सतर्क आणि प्रभावी कार्यपद्धतीचे दर्शन घडवत श्वान पथकाच्या सहाय्याने रेल्वे बोगीमधून मोठ्या प्रमाणात अवैध दारूचा साठा जप्त केला आहे.
रेल्वे क्रमांक 16032 च्या बी-3 बोगीमध्ये दोन प्रवासी अवैधरित्या दारू वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे आज सकाळी सुमारे ९ वाजता काटोल रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दल आणि डॉग स्क्वॉडच्या मदतीने तपासणी मोहीम राबवण्यात आली.
तपासणीदरम्यान बी-3 बोगीतील सीट क्रमांक 47 वर बसलेले गोरेला वान (वय 21) आणि दुला मानस या दोन तरुणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातील एका बॅगमधून 29 दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून त्यांची अंदाजे किंमत ₹96,945 आहे. तसेच दुसऱ्या बॅगमधून 13 दारूच्या बाटल्या सापडल्या असून त्यांची किंमत ₹35,580 असल्याचे सांगण्यात आले आहे.
जप्त करण्यात आलेल्या दारूमध्ये जेम्सन, 100 पायपर, रेड लेबल यांसारख्या महागड्या आणि नामांकित ब्रँडचा समावेश आहे. या धडक कारवाईमुळे दारू तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास रेल्वे सुरक्षा दलाकडून सुरू असून अवैध दारू वाहतुकीच्या मागील सूत्रधारांचा शोध घेतला जात आहे.








