
मुंबई– महानगरपालिकेच्या (BMC) निवडणूक निकालांनी शहरातील राजकीय समीकरणे आमूलाग्र बदलून टाकली आहेत. देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेवर प्रथमच भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत ऐतिहासिक यश मिळवले आहे. या घवघवीत विजयानंतर आता राजकीय वर्तुळाचे लक्ष एका प्रश्नावर केंद्रीत झाले आहे— मुंबईचा नवा महापौर कोण होणार?
निवडणूक प्रचाराच्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले “मुंबईचा महापौर हिंदू आणि मराठी असेल” हे विधान आता प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर हे विधान केवळ राजकीय घोषणा न राहता पक्षासाठी जबाबदारी आणि संधी ठरली आहे. स्थानिक अस्मिता, मराठी नेतृत्व आणि प्रशासकीय क्षमता यांचा समतोल साधत महापौर निवडण्याचे आव्हान भाजपपुढे आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपमधील पाच प्रमुख मराठी उमेदवारांची नावे चर्चेत आली आहेत—
१) तेजस्वी घोसाळकर
दहिसर प्रभागातून दहा हजारांहून अधिक मतांनी दणदणीत विजय मिळवलेल्या तेजस्वी घोसाळकर या सध्या महापौरपदाच्या शर्यतीत आघाडीवर मानल्या जात आहेत. माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या त्या सून असून, २०२३ मध्ये पती अभिषेक घोसाळकर यांच्या दुर्दैवी हत्येनंतर त्या सार्वजनिक जीवनात अधिक सक्रिय झाल्या. ठाकरे गटातून बाहेर पडत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि पहिल्याच निवडणुकीत मोठा विजय मिळवला. तरुण, सुशिक्षित आणि मराठी-हिंदू ओळख असलेला चेहरा म्हणून त्या मुख्यमंत्र्यांच्या निकषांमध्ये बसतात.
२) प्रकाश दरेकर
प्रभाग क्रमांक ३ मधून मोठ्या फरकाने निवडून आलेले प्रकाश दरेकर हे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे बंधू आहेत. दरेकर कुटुंबाचा वायव्य मुंबईत मराठी मतदारांवर प्रभाव असून, प्रशासकीय समज आणि संघटनात्मक ताकद ही त्यांची जमेची बाजू मानली जाते. त्यामुळे महापौरपदासाठी ते एक मजबूत पर्याय ठरू शकतात.
३) प्रभाकर शिंदे
भाजप गटाचे माजी नेते प्रभाकर शिंदे हे महापालिकेतील अत्यंत अनुभवी नगरसेवकांपैकी एक आहेत. बीएमसीचे नियम, प्रक्रिया आणि प्रशासन यांची सखोल जाण असलेला हा मराठी चेहरा ‘सेफ चॉइस’ म्हणून पाहिला जात आहे. अनुभवाच्या जोरावर पक्ष नेतृत्व त्यांच्याकडे जबाबदारी सोपवू शकते.
४) मकरंद नार्वेकर
दक्षिण मुंबईतील प्रभावी नेतृत्व म्हणून ओळख असलेले मकरंद नार्वेकर हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू आहेत. कुलाबा परिसरात त्यांची मजबूत पकड असून ते सातत्याने निवडून येत आहेत. मराठी समाजातून आलेले असले तरी आधुनिक, समावेशक आणि पुरोगामी प्रतिमा हे त्यांचे वैशिष्ट्य आहे, ज्याचा भाजपला शहरी मुंबईत लाभ होऊ शकतो.
५) राजश्री शिरवाडकर
प्रभाग क्रमांक १७२ मधून विजय मिळवलेल्या राजश्री शिरवाडकर या भाजपच्या आक्रमक आणि निष्ठावंत महिला नेत्या म्हणून ओळखल्या जातात. स्थानिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या राजश्री, महिला आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर महापौरपदासाठी प्रबळ दावेदार ठरू शकतात. पक्षाने महिला महापौर करण्याचा निर्णय घेतल्यास त्यांचे नाव निश्चितच आघाडीवर असेल.
कोण होणार बाजी मारणार?
भाजपकडे संख्याबळ, सत्ता आणि पर्यायांची रेलचेल असली तरी महापौरपदासाठी निवड करताना सामाजिक समतोल, राजकीय संदेश आणि मुंबईच्या विविधतेचा विचार करावा लागणार आहे. त्यामुळे अंतिम निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.








