
नागपूर – राज्यात तब्बल 9 वर्षांनंतर पार पडलेल्या 29 महापालिका निवडणुकांसाठी आज 15 जानेवारीला दिवसभर मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळपासूनच विविध मतदान केंद्रांवर मतदारांनी हजेरी लावली. नागपूर महानगरपालिकेत सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत 51 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. मात्र, अपेक्षेपेक्षा मतदानाचा टक्का कमी राहिल्याचे चित्र नागपुरासह राज्यातील अनेक शहरांमध्ये पाहायला मिळाले
नागपुरात ज्येष्ठ नागरिकांपासून ते पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या ‘झेन झी’ मतदारांपर्यंत सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला. काही मतदान केंद्रांवर सकाळी आणि सायंकाळी गर्दी दिसून आली, तरी एकूण मतदानाची टक्केवारी मध्यम पातळीवरच राहिली.
दरम्यान, राज्यातील सर्वात मोठी महानगरपालिका असलेल्या मुंबईत दुपारी 3.30 वाजेपर्यंत 41.08 टक्के मतदान झाले. विशेष म्हणजे मुंबईतील कुलाबा येथील वॉर्ड क्रमांक 227 मध्ये केवळ 15.73 टक्के मतदान झाले असून, हा राज्यातील सर्वात कमी मतदान झालेला वॉर्ड ठरू शकतो. पुण्यातही मतदानाचा उत्साह अपेक्षेप्रमाणे दिसला नाही. पुण्यात 36.95 टक्के, तर पिंपरी-चिंचवडमध्ये 40.50 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
राज्यातील 29 महापालिकांमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेत सर्वाधिक 50.85 टक्के मतदान झाले असून, कोल्हापूर मतदानात अव्वल ठरला आहे. परभणी (49.16 टक्के), अहिल्यानगर (48.49 टक्के) आणि इचलकरंजी (46.23 टक्के) येथेही चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येते.
निवडणूक आयोगाकडून सायंकाळी 5.30 वाजेपर्यंतची अंतिम मतदानाची आकडेवारी जाहीर होणार असून, त्यानंतर अंतिम टक्केवारीत थोडाफार बदल होण्याची शक्यता आहे. मात्र, एकूणच 9 वर्षांनंतर झालेल्या या महापालिका निवडणुकांमध्ये राज्यभर मतदानाचा टक्का घसरल्याचे स्पष्ट होत आहे.








