
नागपूर : नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक–२०२६ मध्ये दिव्यांग मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी मनपा प्रशासनाने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. गुरुवार, १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेदरम्यान दिव्यांग मतदारांना त्यांच्या घरापासून थेट मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी विशेष वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांच्या नेतृत्वात ही सुविधा राबविण्यात येत आहे. दिव्यांग मतदारांसाठी ९१७५४१४३५५ हा स्वतंत्र व्हॉट्सॲप क्रमांक सुरू करण्यात आला असून, या क्रमांकावर आपले सध्याचे लोकेशन शेअर केल्यानंतर संबंधित झोनमधील वाहन मतदाराच्या दारात पोहोचणार आहे.
शहरातील प्रत्येक झोनमध्ये स्वतंत्र वाहन तैनात करण्यात आले असून, सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत दिव्यांग मतदारांना मतदान केंद्र अथवा पोलिंग बूथपर्यंत सुरक्षित व सुलभ सेवा दिली जाणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया झोनल वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली राबवली जाणार आहे.
उल्लेखनीय म्हणजे, नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेवर मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मनपातर्फे ही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच दिव्यांग मतदारांना मतदानाच्या दिवशी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी मनपा केंद्रीय कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या कक्षामार्फत दोन सत्रांत दोन स्वतंत्र चमू कामकाज पाहणार असून, गरज भासल्यास झोन स्तरावर तातडीची कार्यवाही केली जाणार आहे. यासाठी एकूण दहा पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.
मनपा प्रशासनाने दिव्यांग मतदारांनी या सुविधेचा लाभ घेत लोकशाहीच्या उत्सवात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे.








