
नागपूर : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा थरार अंतिम टप्प्यात पोहोचला असतानाच तळीरामांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडावी, यासाठी आजपासून सलग तीन दिवस संबंधित महापालिका क्षेत्रांत ‘ड्राय डे’ जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आजपासून अनेक ठिकाणच्या वाइन शॉप्स, बार आणि परमिट रूम्स बंद राहणार आहेत.
राज्यात गुरुवारी (१५ जानेवारी) होणारे मतदान आणि त्यानंतर शुक्रवारी (१६ जानेवारी) होणारी मतमोजणी लक्षात घेता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने महसूल विभागाच्या मार्गदर्शनाखाली हा आदेश जारी केला आहे.
कधीपर्यंत राहणार मद्यविक्री बंद?
प्रशासनाच्या आदेशानुसार बुधवार (१४ जानेवारी) रोजी संपूर्ण दिवस मद्यविक्री बंद राहणार आहे. गुरुवार हा मतदानाचा दिवस असल्याने त्या दिवशीही वाइन शॉप्स, बार, परमिट रूम्स आणि बिअर शॉपी पूर्णपणे बंद असतील. तसेच शुक्रवारी होणाऱ्या मतमोजणीदरम्यानही मद्यविक्रीवर बंदी राहणार असून, मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी ६ वाजल्यानंतरच मद्यविक्रीस परवानगी दिली जाणार आहे.
या काळात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणारे तसेच बेकायदेशीररीत्या मद्यसाठा करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
का जाहीर करण्यात आला ‘ड्राय डे’?
निवडणूक काळात मतदारांना आमिष दाखवण्यासाठी दारूचा गैरवापर होण्याची शक्यता असते. तसेच मद्यप्राशनामुळे वाद, गोंधळ किंवा अनुचित प्रकार घडून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठीच प्रशासनाने हा तीन दिवसांचा ‘ड्राय डे’ जाहीर केला आहे.
एकीकडे निवडणुकीचा प्रचार आणि मतदानाची धामधूम, तर दुसरीकडे सलग तीन दिवस मद्यविक्री बंद राहणार असल्याने राज्यातील तळीरामांचा घसा कोरडा राहणार, हे मात्र निश्चित आहे.








