
मुंबई : डिसेंबर महिना संपण्याच्या टप्प्यावर आला असतानाही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील नोव्हेंबरचा हप्ता अद्याप महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे मिळून ₹३००० कधी मिळणार, असा प्रश्न लाभार्थी महिलांमध्ये निर्माण झाला आहे. याच दरम्यान केवायसीची अंतिम मुदत जवळ आल्याने चिंता अधिक वाढली आहे.
या संदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. केवायसी न केल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.
आदिती तटकरेंचे स्पष्टीकरण
आदिती तटकरेंनी सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमधून लाडकी बहीण योजनेबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, या योजनेचा लाभ अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य आहे. केवायसीसाठी ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली असून आता मोजकेच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे सर्व लाभार्थी महिलांनी तातडीने केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन त्यांनी केले.
लाडकी बहीण योजनेत केवायसी प्रक्रिया ऑनलाइन असून आतापर्यंत कोट्यवधी महिलांनी ती यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. तरीही अजूनही लाखो महिलांची केवायसी बाकी आहे. शेवटच्या क्षणापर्यंत थांबू नये, अन्यथा तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असा इशाराही आदिती तटकरेंनी दिला आहे.
दरम्यान, केवायसी पूर्ण करणाऱ्या महिलांनाच पुढील हप्त्याचा लाभ मिळणार असल्याचे स्पष्ट झाल्याने नोव्हेंबर–डिसेंबरचा एकत्रित हप्ता मिळण्यासाठी केवायसी करणे अत्यावश्यक ठरणार आहे.








