
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी तिकिटांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला असून अनारक्षित प्रवासासाठी आता तिकिटाची छापील (हार्ड कॉपी) प्रत जवळ बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे. यापुढे केवळ मोबाईल फोनवर तिकिट दाखवून प्रवास करणे ग्राह्य धरले जाणार नाही. हा नियम रेल्वेच्या सर्व विभागांना लागू करण्यात आला आहे.
रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, यूटीएस अॅप, एटीव्हीएम मशीन किंवा काउंटरवरून खरेदी केलेली अनारक्षित तिकिटे मोबाईल स्क्रीनवर दाखवली तरी ती वैध मानली जाणार नाहीत. मात्र, ई-तिकिटे आणि एम-तिकिटे या नियमातून वगळण्यात आली आहेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
एआयद्वारे बनावट तिकिटांचा वाढता धोका-
रेल्वे प्रशासनाने हा निर्णय बनावट तिकिटे आणि फसवणूक रोखण्यासाठी घेतल्याचे सांगितले आहे. सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा वापर वाढत असून, त्याचा गैरवापर करत खोटी तिकिटे तयार केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे रेल्वेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
जयपूर मार्गावरील धक्कादायक प्रकार-
अलीकडेच जयपूर मार्गावर तपासणीदरम्यान एक गंभीर प्रकार उघडकीस आला. काही विद्यार्थी मोबाईलवर दाखवलेल्या तिकिटांवर प्रवास करत होते. तिकिटांवरील क्यूआर कोड, प्रवासाची माहिती आणि भाडे तपशील योग्य दिसत होते. मात्र, टीसीने सखोल तपासणी केल्यानंतर हे स्पष्ट झाले की एकाच अनारक्षित तिकिटात एआयच्या मदतीने बदल करून सात जण प्रवास करत होते.
संपूर्ण देशभर अलर्ट; तपासणी आणखी कडक-
या घटनेनंतर रेल्वेने सर्व विभागांना अलर्ट जारी केला आहे. टीटीई आणि टीसी यांच्या मोबाईल व टॅब्लेटमध्ये विशेष तपासणी अॅप इन्स्टॉल करण्यात आले आहे. संशयास्पद तिकिट आढळल्यास क्यूआर कोड स्कॅन करून यूटीएस नंबर आणि रंग कोड तपासले जातील, त्यामुळे तिकिट खरे की बनावट हे तात्काळ समजणार आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, अनारक्षित प्रवासासाठी तिकिटाची प्रत्यक्ष छापील प्रत बाळगणे आवश्यक आहे. भविष्यातील फसवणूक टाळण्यासाठी तिकीट दलाल आणि गैरप्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.








