
नागपूर : हिवाळी अधिवेशनामुळे नागपुरात विविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापले आहे. याच काळात स्वतंत्र विदर्भाची मागणी पुन्हा गती घेऊ लागल्याने वातावरण अधिकच तापलं आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विदर्भाच्या विकासातील प्रचंड तफावत, सामाजिक वर्गांना मिळणाऱ्या संधींची कमतरता आणि सत्तेतल्या मर्यादित सहभागाचा मुद्दा उपस्थित करत स्वतंत्र राज्याची गरज अधोरेखित केली होती. या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे यांनी निर्णायक विधाने करून नवी चर्चा सुरू केली.
विदर्भ महाराष्ट्रापासून कधीच वेगळा होऊ शकत नाही —
उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत विदर्भ विभाजनाबाबत विचारलेल्या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले,स्वतंत्र विदर्भाचा प्रश्नच नाही. महाराष्ट्राची रचना, इतिहास आणि भावनिक एकात्मता हे दोघांना एकत्र बांधून ठेवतात. ते पुढे म्हणाले की, सरकारने स्पष्ट सांगावं महाराष्ट्राला एकसंध ठेवण्याचा निर्धार आहे की राज्य फोडण्याच्या दिशेने पावलं टाकत आहात? कारण हा विषय महाराष्ट्राच्या अस्तित्वाशी निगडित आहे.
फक्त मागणी नाही, कामही दाखवा- ठाकरेंचा टोला स्वतंत्र विदर्भाचे समर्थक असणाऱ्यांना उद्देशून ठाकरे म्हणाले,ज्यांना वेगळा विदर्भ हवा आहे त्यांनी प्रथम या अधिवेशनात विदर्भाशी संबंधित कोणते मुद्दे मांडले, हे स्पष्ट करावं.
लोकांसमोर कामगिरी ठेवावी.त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री स्वतः विदर्भातील आहेत, हे नमूद करत सांगितले की विदर्भाच्या प्रश्नांवर सरकारनेच सर्वात आधी ठोस भूमिका मांडली पाहिजे.
विरोधी पक्षनेते पदावरही लक्ष-
उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्याशी भेट घेऊन विरोधी पक्षनेते पद तातडीने भरावे, अशी मागणी केली. ते म्हणाले,दोघेही म्हणतात विचार सुरू आहे. पण हीच प्रतिक्रिया मागच्या अधिवेशनात मिळाली होती.
प्रत्यक्षात निर्णय कधी घेतला जातो ते पाहणं महत्वाचं आहे. त्यांनी सांगितले की, विरोधी पक्षनेता नसल्याने जनतेच्या मुद्द्यांवर दडपण आणणे कठीण होते आणि लोकशाही प्रक्रियेलाही अडथळा निर्माण होतो.
स्वतंत्र विदर्भाचा प्रश्न पुन्हा राजकीय वर्तुळात जोर धरत असला तरी, उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र एकसंध ठेवण्याचा संदेश देत चर्चा वेगळ्याच दिशेला वळवली आहे.









