
मुंबई : राज्यातील शिक्षण व्यवस्थेतील गंभीर स्थिती विधानभवनात पुन्हा एकदा उघडी पडली आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये तब्बल ३७ हजार शिक्षकांची पदे रिक्त असून शिक्षणाचा अक्षरशः “खेळखंडोबा” झाला असल्याचा आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केला.
प्रश्नोत्तरांच्या काळात जिल्हा परिषद शाळांतील प्राथमिक शिक्षकांच्या बदलीचा मुद्दा उपस्थित झाला. यावेळी वडेट्टीवार यांनी सरकारवर कडाडून टीका केली.
“एकीकडे शिक्षकांची हजारोंची पदे रिक्त आहेत, तर दुसरीकडे ५५ हजार जिल्हा परिषद शाळा बंद करण्याच्या चर्चा सुरू आहेत. शिक्षणासारख्या महत्वाच्या विषयाकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी सभागृहात ठेवला.
वडेट्टीवार यांनी उदाहरण देताना सांगितले की, चंद्रपूर जिल्ह्यात सात वर्गांसाठी फक्त तीन शिक्षक उपलब्ध आहेत. “अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी शिकायचे तरी कसे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राज्यभरातील रिक्त पदांची अचूक माहिती जाहीर करून मर्यादित कालावधीत भरती प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी त्यांनी सरकारसमोर केली.
यावर उत्तर देताना शिक्षणमंत्री जयकुमार गोरे यांनी राज्यात फक्त १५ हजार शिक्षकांची पदे रिक्त असल्याचा दावा केला. मात्र वडेट्टीवार यांनी हा आकडा चुकीचा असल्याचे सांगत अधिकारी सरकारची दिशाभूल करत आहेत, अशी टीका केली. “पोर्टलला नाव ‘पवित्र’ असलं तरी काम मात्र अपवित्र सुरू आहे,” असा घणाघाती आरोप त्यांनी केला.
शेवटी मंत्री गोरे यांनी मान्य केले की चंद्रपूर जिल्ह्यात ४७२ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. तसेच राज्यात शिक्षक भरतीसाठी नवीन पद्धत लागू करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सभागृहात सांगितले.
राज्यातील शिक्षण क्षेत्रातील ही गंभीर परिस्थिती पाहता, शिक्षक भरतीचा विषय पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.









