
नागपूर: उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. नितीन राऊत यांनी आज बेझनबाग कार्यालयात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्यासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमधील सर्व अपूर्ण कामांची सविस्तर माहिती दिली. या चर्चेनंतर कन्व्हेन्शन सेंटर येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची उच्चस्तरीय बैठक पार पडली.
या चर्चेनुसार सामाजिक न्याय विभाग, एनआयटी व एनएमआरडीए च्या अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश देण्यात आले की, कन्व्हेन्शन सेंटरमधील प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. कामाच्या गुणवत्तेवर कोणताही समझोता न करता वेळेत पूर्णत्व घेण्यावर भर देण्यात आला.
तीन महिन्यांत अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे आदेश
बैठकीत विभागातील प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. कन्व्हेन्शन सेंटरमधील अपूर्ण कामे पुढील तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले. मंत्री संजय शिरसाठ यांनी आश्वस्थ केले, की “या प्रकल्पासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. अधिकाऱ्यांनी कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करावीत.”
डॉ. नितीन राऊत यांचे योगदान
डॉ. नितीन राऊत यांच्या दूरदृष्टीने व सातत्यपूर्ण प्रयत्नाने हे भव्य कन्व्हेन्शन सेंटर उभे राहिले आहे. या बैठकीला नागपूर उत्तर आमदार श्री. डॉ. नितीन राऊत, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव श्री. डॉ. हर्षदीप कांबळे, आयुक्त व सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उत्तर नागपूरचा अभिमान सज्ज होणार
या बैठकीमुळे बुद्ध-फुले-शाहू-आंबेडकर विचारांचे जागतिक केंद्र लवकरच सज्ज होईल. विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि जनसामान्यांना सक्षम सेवा देण्यासाठी ही बैठक फलदायी ठरली.









