
नागपूर – राज्यातील अतिवृष्टी, पूरस्थिती आणि सततच्या पावसाने द्राक्ष उत्पादकांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. द्राक्ष उत्पादनात तब्बल ६० टक्क्यांची घट झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. परिणामी वाइन उद्योगावर मोठा परिणाम झाला असून येत्या काही दिवसांत वाइनच्या दरात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नववर्षानिमित्त आयोजित होणाऱ्या पार्ट्यांमध्ये वाइनचा आनंद लुटणे आता नागरिकांच्या खिशावर ताण आणू शकते.
राज्यातील नाशिक, धाराशिव, सोलापूर, पुणे, सातारा आणि सांगलीसारख्या द्राक्षपट्ट्यात यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याने द्राक्षबागांचे प्रचंड नुकसान झाले. परिणामी द्राक्षांचे क्षेत्रफळ १० हजार हेक्टरवरून ६ हजार हेक्टरपर्यंत खाली आल्याची माहिती समोर आली आहे.
वाइन उत्पादनात कोटी लिटरने घट-
अतिवृष्टीमुळे द्राक्षांचे उत्पन्न घटल्याने वाइन उद्योगास आवश्यक कच्चा माल उपलब्ध करणे अवघड झाले. दरवर्षी वाइन उद्योगाकडून द्राक्ष २० ते २५ रुपये किलो दराने खरेदी केली जातात; मात्र यावर्षीच्या नुकसानामुळे हीच किंमत ४० ते ५० रुपये किलोपर्यंत गेली आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे.
सामान्यतः राज्यात दरवर्षी ३ कोटी लिटर वाइन तयार केली जाते. मात्र यावर्षी उत्पादनात तब्बल १ कोटी लिटरची घट होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. उत्पादनातील ही घट आणि वाढलेला खर्च लक्षात घेता वाइनच्या दरात वाढ अपरिहार्य असल्याचे उद्योगातील तज्ज्ञांचे मत आहे.
नववर्ष साजरे करणे महागात पडणार-
वाइनचे दर वाढण्याची शक्यता निर्माण झाल्याने ‘न्यू इअर ईव्ह’साठी तयारी करणाऱ्या नागरिकांच्या खर्चात वाढ होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आधीच वाढत्या महागाईची झळ बसत असताना आता वाइनचे दर वाढल्याने पार्टीचा खर्च अधिक चटका देणारा ठरू शकतो.
राज्यातील हवामानातील अनिश्चितता, पूरस्थिती आणि शेतीचे झालेले नुकसान यामुळे द्राक्ष उत्पादकांसह वाइन उद्योगासमोर मोठे आव्हान उभे राहिले असून त्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर पडणार आहे.









