
नागपूर – खापरखेडा येथील बिना संगम त्रिवेणी घाटावर राख विसर्जनासाठी आलेल्या दोन गटांमध्ये झालेल्या किरकोळ वादाने मोठं रूप धारण करत हिंसाचाराचा चेहरा घेतला. अचानक पेटलेल्या या हाणामारीत तब्बल सहा जण जखमी झाले असून, खापरखेडा पोलिसांनी सात जणांविरुद्ध दंगल आणि मारहाणीचे गुन्हे दाखल केले आहेत. यापैकी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
कसा पेटला वाद?
पांढराबोडी येथील विमलाबाई करनुके या आपल्या नातेवाइकांसह किसनाबाई डहारे यांच्या राख विसर्जनासाठी त्रिवेणी घाटावर गेल्या होत्या. विसर्जनानंतर परतताना त्यांचे भाऊ दिलीप डहारे घाटाजवळ बसले होते. त्याचवेळी एका युवकाने अचानक येऊन दिलीप यांच्या पायावर पाय ठेवला. यामुळे सुरू झालेली किरकोळ बाचाबाची थेट हातघाईपर्यंत पोहोचली.
थोड्याच वेळात त्या युवकाचे पाच–सहा साथीदारही तेथे दाखल झाले. त्यांनी जवळील झुणका-भाकर दुकानातील चुलीतल्या जळत्या लाकडांचे हत्यार बनवत दिलीपवर हल्ला केला. यात त्यांच्या डोक्यावर आणि हातावर गंभीर जखमा झाल्या.
नातेवाईकही जखमी-
गोंधळ ऐकून मदतीला आलेले दिलीपचे नातेवाईक — दिनेश डहारे, बंडू मांढरे, अज्जू दिघोरे, विशाल उर्फ गणेश मांढरे आणि अर्जुन चाचरकर — यांनाही आरोपींनी मारहाण केली.
पोलीस कारवाई-
सूचना मिळताच खापरखेडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणात आदित्य तेलगोटे, आयुष तेलगोटे, आशीष गवली, नरेश लोखंडे, गोलू बागडे, रवि वरठी आणि साहिल यांच्यावर दंगल, मारहाण आणि दुखापत करण्याचा प्रयत्न या गंभीर आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आदित्य आणि आयुष तेलगोटे यांना अटक केली असून उर्वरित आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.घटनास्थळावरील तणावानंतर परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.









