
नागपूर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या सुरूवातीलाच विरोधी पक्षनेतेपदाचा वाद पुन्हा पेटला आहे. ठाकरे गटात या पदासाठी नवे समीकरण तयार होत असून, अनुभवी आमदार भास्कर जाधव यांना वगळून आदित्य ठाकरेंना संधी देण्याची चर्चा जोर धरू लागली आहे. अनेक महिन्यांपासून विरोधी पक्षनेतेपदासाठी जाधवांचे नाव पुढे येत होते. मात्र आता त्यांची जागा आदित्य ठाकरेंना दिली जाऊ शकते, असे बोलले जात आहे.
या चर्चेबाबत भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया देताना सरकार आणि विधिमंडळ सचिवालय या दोघांवर सवाल उपस्थित केले. विरोधी पक्षनेतेपदासाठी १० टक्के सदस्यसंख्येची अट असल्याचे सरकारकडून सांगितले जात असले तरी ही अट कुठेही नमूद नाही, असा दावा त्यांनी केला. त्यांनी विधीमंडळ सचिवालयाकडून मिळालेलं पत्र दाखवून या अटीला कोठेही घटनात्मक आधार नसल्याचे सांगितले.
जाधव यांनी स्वतःला पद्धतशीरपणे बाजूला केल्याचीही टीका केली. “मी आक्रमक आहे म्हणून मला हे पद नको, अशी भूमिका सत्ताधाऱ्यांची असल्याचे दिसते,” असे ते म्हणाले. तसेच त्यांनी उपमुख्यमंत्री पदावरही टीका करत ते केवळ राजकीय समायोजन असल्याचे म्हटले.
राज्य सरकारवरही त्यांनी वार केला. गंभीर गुन्ह्यांमध्ये चौकशीपूर्वीच क्लिनचीट देण्याची घाई केल्यामुळे तपासावर परिणाम होतो, असा आरोप त्यांनी केला. पार्थ पवार यांच्याशी संबंधित प्रकरणांचा संदर्भ देत त्यांनी मुख्यमंत्री पक्षपाती निर्णय घेत असल्याचेही म्हटले.
विरोधी पक्षनेतेपदावरून ठाकरे गटात निर्माण झालेली ही परिस्थिती हिवाळी अधिवेशनाच्या सुरूवातीलाच राजकीय तापमान वाढवणारी ठरत आहे.









