
नागपूर – येत्या हिवाळी अधिवेशनात माध्यमांना वार्तांकन करताना होणारा त्रास आता मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. कारण, यंदा पहिल्यांदाच विधानसभा आणि विधान परिषदेतील संपूर्ण कामकाज थेट लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मर्यादित वार्ताहर गॅलरी आणि वाढती उपस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय पत्रकार हिताचा ठरणार आहे.
विधानसभा सचिव विलास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली आज नागपुरात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत या सुविधेची घोषणा झाली. बैठकीस महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रह्माशंकर त्रिपाठी, महासचिव अनूपम सोनी यांसह पदाधिकारी उपस्थित होते.
काय असणार सुविधा?
प्रत्येक पत्रकाराला कामकाज पाहण्यासाठी विशेष लाईव्ह लिंक
मोबाईलवरूनही संपूर्ण अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण
मंजूर भाग युट्युब व इतर अधिकृत प्लॅटफॉर्मवरून डाउनलोड करण्याची मुभा
सर्व माध्यम प्रतिनिध्यांसाठी सुविधा पूर्णपणे खुली
या निर्णयामुळे हिवाळी अधिवेशनाचे वार्तांकन अधिक वेगवान, पारदर्शक आणि तांत्रिकदृष्ट्या समृद्ध होणार आहे. पत्रकारांसाठी ही मोठी दिलासादायक सुविधा ठरणार असल्याचे सचिवालयाने स्पष्ट केले आहे.









