
मुंबई – महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तापलेल्या असताना एक वेगळीच राजकीय हलचल मंगळवारी रात्री पाहायला मिळाली. मुंबईतील एका खासगी समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना (ठाकरे) गटाचे ज्येष्ठ नेते व खासदार संजय राऊत यांची अचानक भेट झाली. जवळपास वीस मिनिटांचा संवाद झाल्याने या दोन्ही नेत्यांच्या भेटीची चर्चा राज्यभर जोरदार रंगत आहे.
समोर आलेल्या छायाचित्रात संजय राऊत मास्क लावून बसलेले दिसतात, तर फडणवीस त्यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारताना दिसले. सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री फडणवीस यांनी राऊत यांच्या प्रकृतीची चौकशी केली व नुकत्याच झालेल्या वैद्यकीय उपचारांबाबतही विचारपूस केली. अलीकडेच राऊत पूर्ण बरे झाल्याने ही भेट अधिक सौहार्दपूर्ण ठरली.
निवडणूक वातावरण तापलेले असताना विरोधी गटातील दोन महत्त्वाच्या नेत्यांची अशी भेट होताच राजकीय वर्तुळात शक्यता आणि विश्लेषणांचा भडिमार सुरू झाला आहे. ही भेट फक्त शिष्टाचारापुरती होती की यामागे काही रणनीती दडलेली आहे, याबाबतही चर्चा रंगू लागल्या आहेत. आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर काही राजकीय संकेत दिले गेले का, हा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वीच पत्रकारांशी बोलताना फडणवीसांबद्दल चांगली भावना व्यक्त केली होती. “फडणवीस आमचे जुने सहकारी. आजारपणात त्यांनी फोन करून विचारपूस केली. राजकारण हे एक क्षेत्र, पण मानवी नाती वेगळी,” असे राऊत म्हणाले होते.
त्यावर प्रतिसाद देताना फडणवीस म्हणाले होते, “राऊत बरे झाले हे समाधानकारक. मतभेद असले तरी वैयक्तिक पातळीवर कुणाशीही द्वेष नाही.”
राजकीय संघर्ष, आरोप-प्रत्यारोप यांच्या वातावरणातही नेत्यांमधील वैयक्तिक जवळीक कायम असल्याचे या भेटीतून दिसून आले. आता या भेटीचा परिणाम पुढील राजकीय समीकरणांवर होणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.









