
मुंबई – महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राज्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून निवडणूक प्रक्रिया कोणत्याही प्रकारे पुढे ढकलू नये, अशी मागणी केली आहे. अलीकडील निर्णयांमुळे निर्माण झालेली गोंधळाची परिस्थिती त्वरित दूर करण्याची त्यांनी सुचना केली.
चव्हाण यांनी पत्रात नमूद केले की,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने अलीकडील परिपत्रकाद्वारे 24 नगराध्यक्ष पदांसह 204 नगरसेवकांच्या मतदारसंघांमध्ये पुन्हा मतदानाची सूचना केली आहे. यामुळे संपूर्ण राज्यात संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे.”
ते पुढे म्हणाले की,4 नोव्हेंबर 2025 रोजी आयोगाने जारी केलेल्या सूचनांमध्ये आणि 29 नोव्हेंबर 2025 रोजी काढलेल्या सुधारित आदेशांमध्ये स्पष्ट विसंगती आहे. महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक नियम 1966 मधील नियम 17(1) च्या अनुषंगाने आयोगाने ही दुरावस्था तपासावी.
चव्हाण यांनी पुढे सुचवले की,ज्या ठिकाणी अपीलवरील निकाल 26 नोव्हेंबर 2025 नंतर आले आहेत किंवा संबंधित उमेदवार स्वतः हलफनामा सादर करत आहे, अशा सर्व बाबींचा विचार करून निवडणूक प्रक्रिया विनाविलंब सुरू ठेवावी. राज्यातील मतदारांना मतदानाचा अधिकार बजावता यावा, हे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे.शेवटी त्यांनी आयोगाला या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आवाहन केले.









