
नागपूर :गायत्री महिला औद्योगिक सहकारी संस्था आणि एमएसएमई डीएफओ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महिला उद्योजिकांसाठी आयोजित करण्यात आलेला ‘परसेप्शन एक्स्पो-२०२५’ ६ ते ९ डिसेंबरदरम्यान सिव्हिल लाइन्स येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात रंगणार आहे. महिला उद्योजकांच्या विविध व्यवसाय, कला आणि कौशल्याचे दालन एकाच व्यासपीठावर आणणारा हा उपक्रम असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा कांचनताई गडकरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेत सचिव विजयाताई भुसारी, नेहा लघाटे, अंजली मुळे, अपर्णा शिरपूरकर, उर्मिला सराफ, रेखा सप्तर्षी, ज्योत्स्ना डहाके, अनघा धारकर, निलिमा गढीकर, कविता भुरे, वर्षा शर्मा, संध्या कोठेकर, मंजु तऱ्हाटे आणि वंदना कठाळे उपस्थित होत्या.
मेळाव्याचे उद्घाटन व कार्यक्रमांची रूपरेषा-
६ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता एमएसएमई डीएफओचे संचालक व्ही.आर. शिरसाट यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन होईल. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या संचालिका श्रीमती आस्था कार्लेकर मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
७ डिसेंबरला अवंती काटे यांचे ‘भारत माता’ हे विशेष सादरीकरण तर ८ डिसेंबरला डॉ. संगिता बानाईत व समूह ‘अभंगवारी’ कार्यक्रम सादर करणार आहे. ९ डिसेंबरला मान्यवरांच्या उपस्थितीत समारोप होईल.
स्थानिक महिला उद्योजिकांसाठी मोठी संधी-
मेळाव्यात हस्तकला, गृहोपयोगी वस्तू, आकर्षक दागदागिने, पारंपरिक अलंकार, सजावटीची सामग्री यांसह विविध उत्पादनांचे स्टॉल्स उभारले जाणार आहेत. उद्योजिकांच्या व्यवसायवृद्धीला गती देण्यासाठी हा मेळावा उपयुक्त ठरणार असून, दरवर्षी मोठ्या प्रमाणावर महिला यामध्ये सहभागी होत असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
गेल्या सात वर्षांपासून या उपक्रमाद्वारे नवउद्योजिकांना स्वतंत्र बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे काम संस्था सातत्याने करत आहे.
संस्थेची वाटचाल व उपक्रम-
१९९६ साली स्थापन झालेल्या गायत्री महिला औद्योगिक सहकारी संस्थेने अतिशय लहान गटातून प्रवास सुरू करून आज व्यापक कार्यक्षेत्र तयार केले आहे.
आठवडी बाजार, छोटेखानी मेळावे, कार्यशाळा, सरकारी योजनांची माहिती, आर्थिक सहाय्यासाठी मार्गदर्शन अशा विविध उपक्रमांतून महिलांना स्वावलंबनाकडे नेण्याचे कार्य संस्था करते.
एमएसएमईमार्फत अनेक उद्योजिकांना वित्तीय मदत मिळवून देण्यासाठी संस्था महत्त्वाचे मार्गदर्शन करते. याच अंतर्गत यंदाचा ‘परसेप्शन एक्स्पो’ आयोजित केला आहे.
संस्थेने प्लास्टिकमुक्त भारत अभियानांतर्गत पेपर बॅग, कापडी पिशव्या, ज्युट व कॅनव्हास बॅग, लॅपटॉप बॅग यांचे उत्पादन नियमित सुरू ठेवले आहे. कोरोना काळात महिलांना मास्क व पिशवी शिवण्याचे काम देऊन जवळपास ८० हजार मास्क तयार करण्यात आले.
सध्या १५० ते ५०० महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात संस्थेचे महत्त्वपूर्ण योगदान असून २०२४-२५मध्ये संस्थेची उलाढाल ३४ लाखांवर पोहोचली आहे. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत २४ लाखांची विक्री झाली असून दरवर्षी सुमारे २०० नवउद्योजिका संस्थेशी जोडल्या जातात.









