
गोंदिया : तिरोडा तालुक्यातील इंदोरा-निमगाव परिसरात शनिवारी घडलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत मुलीचे नाव रुची देवानंद पारधी (वय ९) असे असून ती आपल्या वडिलांसोबत शेतात गेली असताना हा हल्ला झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास वडील तारेचे कुंपण बांधत असताना रुची थोड्या अंतरावर कड्यावर उभी होती. त्याचवेळी झुडपातून बाहेर पडलेल्या बिबट्याने अचानक तिच्यावर झडप घातली. हल्ल्यानंतर त्याने मुलीला काही अंतरापर्यंत ओढत नेले. तिच्या आरडाओरडीनंतर वडील आणि जवळ काम करणारे शेतकरी घटनास्थळी पोहोचले. मानवी हालचाल पाहताच बिबट्या जंगलाकडे पळून गेला.
गंभीर जखमी स्थितीत रुचीला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर तिला गोंदियातील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले; मात्र उपचारादरम्यान रात्री आठच्या सुमारास तिचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर गावकऱ्यांनी वन विभागाकडे परिसरात वाढत्या वन्यप्राण्यांच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्याची आणि संबंधित बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली आहे. तिरोडा तालुक्यातील इंदोरा-निमगाव परिसरात भीतीचे सावट असून, गावकऱ्यांनी सुरक्षेची मागणी तीव्र केली आहे.









