
मुंबई – राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायती निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने अंतिम तयारी पूर्ण केली असून यंदा मतदानाची वेळ बदलण्यात आली आहे. २ डिसेंबर रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत मतदान करणे आवश्यक राहणार आहे. आयोगाने याबाबत राज्यातील सर्व जिल्ह्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्यामुळे मतदारांनी वेळेपूर्वी मतदान केंद्रावर पोहोचणे गरजेचे ठरणार आहे.
राज्यातील एकूण २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी निवडणुका होत असून, यामध्ये १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ मतदार सहभागी होणार आहेत. मतदानासाठी एकूण १३,३५५ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. ईव्हीएमच्या माध्यमातून मतदान होणार असून, १३,७२६ कंट्रोल युनिट आणि २७,४५२ बॅलेट युनिटसाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाने ‘दुबार मतदार’ या गंभीर समस्येकडे विशेष लक्ष दिले आहे. मतदारयादीत दोन ठिकाणी नावे आढळणाऱ्या मतदारांच्या नावासमोर डबल स्टार चिन्ह ( ** ) लावण्यात येणार आहे. अशा मतदारांनी मतदान केंद्रावर त्यांचे मतदान कुठे होणार आहे, याची माहिती देणे गरजेचे आहे. एकाच मतदाराकडून दोन वेगवेगळ्या ठिकाणी मतदान होणार नाही यासाठी कडक पावले उचलण्यात आली आहेत.
निवडणुका सुरळीत पार पडाव्यात यासाठी २८८ निवडणूक निर्णय अधिकारी, २८८ सहायक अधिकारी नियुक्त करण्यात आले असून, ६६,७७५ अधिकारी व कर्मचारी मतदानाच्या वेळी कार्यरत राहणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर ईव्हीएमची तपासणी, सुरक्षा आणि मतदान गतीवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र टीम्स तयार करण्यात आल्या आहेत.
मतमोजणी ३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल. मतमोजणीदरम्यान मतदान केंद्रावरील ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठी कडक सुरक्षा व सीसीटीव्ही व्यवस्था करण्यात आली आहे. निकाल जाहीर करताना पारदर्शकता राखण्यासाठी व्हिडिओ रेकॉर्डिंग तसेच अतिरिक्त निरीक्षक आणि तांत्रिक पथक तैनात राहणार आहेत.निवडणूक आयोगाने मतदारांना वेळेचे पालन करून शांततेत मतदान करण्याचे आवाहन केले आहे.









