नागपूर – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (जी.एम.सी.एच.), नागपूर येथे २९ आणि ३० नोव्हेंबर रोजी आयोजित ‘रोबोसर्ज २०२५’ या राष्ट्रीय परिषदेच्या पार्श्वभूमीवर मोठी चळवळ पाहायला मिळत आहे. अत्याधुनिक रोबोटिक तंत्रज्ञान, आधुनिक शस्त्रक्रियांचे प्रात्यक्षिक आणि कौशल्यवर्धन प्रशिक्षण यांचा समन्वय असलेली ही परिषद देशभरातील अनुभवी सर्जन आणि उदयोन्मुख तज्ज्ञांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.
पहिल्यांदाच या परिषदेच्या माध्यमातून ‘रिसिप्रोकल टेलीसर्जरी’चे अनोखे प्रदर्शन होणार आहे. यामध्ये नागपूरमधील रुग्णावर मोरादाबाद येथून, तर मोरादाबादमधील रुग्णावर नागपूर येथून रोबोटच्या साहाय्याने शस्त्रक्रिया केली जाणार आहे. एस. एस. आय. मंत्रा रोबोटिक सर्जरी सिस्टमचा वापर करून डॉ. राज गजभिये यांच्या नेतृत्वाखाली हा ऐतिहासिक प्रयोग पार पाडला जाणार असून, भारतातील दूरस्थ रोबोटिक शस्त्रक्रियेतील ही मोलाची पायरी मानली जाते.
परिषदेच्या दोन दिवसांत जागतिक पातळीवर वापरल्या जाणाऱ्या चार प्रगत रोबोटिक प्लॅटफॉर्मवरून थेट शस्त्रक्रियांचे प्रक्षेपण होणार आहे. सहभागी डॉक्टरांना विविध यंत्रणा हाताळण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे, तसेच विशेष हँड्स-ऑन सत्रांमधून रोबोटिक प्रणालींचा बारकाईने अभ्यास करण्याची संधी मिळेल.
या भव्य परिषदेचे उद्घाटन ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार असून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. तर एस. एस. इनोव्हेशन्सचे संस्थापक आणि जागतिक ख्यातीचे रोबोटिक सर्जन डॉ. सुधीर श्रीवास्तव हे मान्यवर पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत.
रोबोसर्ज २०२५ ही परिषद जी.एम.सी.एच. नागपूरकडून तंत्रज्ञानाधारित आरोग्यसेवेचा विस्तार करण्याच्या दिशेने उचललेले एक निर्णायक पाऊल मानले जात असून, वैद्यकीय क्षेत्रात नव्या संधी आणि संशोधनासाठी हे व्यासपीठ महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.










