
नागपूर – दिल्ली ब्लास्ट प्रकरणातील मनी लॉण्ड्रिंगशी नाव जोडत सायबर गुन्हेगारांनी नागपूरातील ७१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला तब्बल ₹२९.३० लाखांनी गंडवले. ‘सहकार्य केले नाही तर अटक होईल’ अशी भीती दाखवत आरोपींनी त्यांना तथाकथित ‘डिजिटल हाऊस अरेस्ट’ मध्ये ठेवले. या प्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
११ नोव्हेंबर रोजी पीडितांना व्हॉट्सअॅपवरून एका अनोळखी व्यक्तीचा व्हिडिओ कॉल आला. समोरील व्यक्तीने स्वतःला मुंबई पोलीस आयुक्तालयातील उपनिरीक्षक सुमित मिश्रा असल्याचे सांगितले. त्याने दिल्ली ब्लास्ट प्रकरणात मनी लॉण्ड्रिंग झाली असून त्यात पीडितांचे नाव आल्याचा खोटा दावा केला. सहकार्य केले नाही तर तात्काळ अटक केली जाईल, अशी धमकीही दिली.
या भीतीच्या पार्श्वभूमीवर पीडितांना कोणीही संपर्क साधू नये, फोन करू नये, अशी सक्त ताकीद देत आरोपीने त्यांना तथाकथित डिजिटल नजरकैदेत ठेवले. त्यानंतर दुसऱ्या एका व्यक्तीने कॉल करून स्वतःला लखनऊ ATSचा अधिकारी म्हणून दर्शवले आणि तीच धमकी पुन्हा दिली.
या सततच्या दबावाखाली ज्येष्ठ नागरिकांनी विविध व्यवहारांतून २९ लाख तीस हजार रकमेचे ट्रान्सफर केले. यासाठी त्यांनी आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सेसुद्धा मोडली. शेवटी पैसे संपल्यावर आरोपींनी संपर्क तोडला.
घटनेची माहिती मिळताच सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून संबंधित फसवणूक करणाऱ्यांच्या शोधासाठी तपास सुरू केला आहे. अशी फसवणूक टाळण्यासाठी अनोळखी व्हिडिओ कॉल, पोलीस ओळख सांगणारे कॉल, धमक्या किंवा पैसे मागणारे नंबर यांच्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.









