
मुंबई – आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे युतीबाबत सुरू असलेल्या चर्चांना नवे वळण मिळाले आहे. जागा वाटपातील वाढत्या पेचामुळे स्वतः उद्धव ठाकरे आज शिवतीर्थावर राज ठाकरे यांच्या भेटीस पोहोचल्याची माहिती सूत्रांनी दिली. निवडणुका तोंडावर असताना दोन्ही पक्षांमध्ये सुरू असलेला ताण आणि महत्त्वाच्या 75 जागांवरील मतभेद हे या बैठकीचे प्रमुख कारण असल्याचे समजते.
मे महिन्यात ‘एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी’ अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी वरळी डोममधील सभेत केल्यानंतर दोन्ही पक्षांच्या एकत्र लढाईची चर्चा वेगाने सुरू झाली होती. ठाकरे ब्रँडची ताकद आगामी मुंबई महापालिकेत दाखवण्याचा संकल्प करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात जागा वाटपावरून काही महत्त्वाच्या विभागांत मतभिन्नता वाढल्याने तिढा उभा राहिला.
यापूर्वी दोन्ही पक्षांच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या बैठकीत अनेक जागांवरून कठोर भूमिका घेतल्याचे दिसून आले. काही प्रभागांवर दोन्ही पक्ष आग्रही असल्याने कुठलाही तोडगा न निघाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यानंतर परिस्थिती गंभीर बनल्याने साऱ्या चर्चेचा ताण कमी करण्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी शिवतीर्थावर गेले.
मनसेला 227 पैकी काही महत्त्वाच्या आणि ‘जिंकण्याजोग्या’ जागांची मागणी आहे. तर उद्धव सेनेनेही काही प्रभागांवर दावा सोडण्यास अनिच्छा दर्शवल्याने जागा वाटपाचा पेच सुटणं कठीण झालं आहे. सध्याच्या घडीला दोन्ही पक्षांमध्ये सुमारे 75 जागांवरून खलबतं सुरू असल्याची माहिती मिळते.
याशिवाय, मनपा निवडणुका सहा महिने पुढे ढकलल्या गेल्यास त्याचा राजकीय आराखडा काय असावा, यावरही दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महायूतीतील सध्या सुरू असलेली धूसफूस, पक्ष प्रवेश, आणि विद्यमान राजकीय उलथापालथ यावरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केल्याचे सांगितले जात आहे.
जागा वाटपाचा हा पेच सुटतो की आणखी गुंतागुंत वाढते, याकडे आता मुंबईच्या राजकारणाचे लक्ष्य लागले आहे.









