
मुंबई : शाळा आणि महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवासात होणाऱ्या अडचणींचा शेवट करण्यासाठी एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री व एसटीचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विद्यार्थ्यांसाठी विशेष हेल्पलाईन क्रमांक 1800 221 251 सुरू केल्याची घोषणा केली. शाळा–कॉलेजला जाताना किंवा घरी परतताना कोणतीही अडचण आल्यास विद्यार्थी या क्रमांकावर संपर्क करू शकतात.
बस उशिरा येणे, रद्द होणे, नुकसानाची थेट जबाबदारी अधिकाऱ्यांवर-
बर्याचदा एसटी बस लेट होणे, अचानक रद्द होणे किंवा इतर कारणांमुळे विद्यार्थ्यांच्या वर्गांचा, परीक्षांचा नुकसान होत असे. काही विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या परीक्षा देखील द्यायला वेळेवर पोहोचता येत नसे.
नव्या निर्देशांनुसार, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे असे नुकसान झाल्यास संबंधित क्षेत्रातील डिपो मॅनेजर आणि सुपरवायझर यांना जबाबदार धरले जाईल.
सुपरवायझरची बसस्टॉपवर अनिवार्य उपस्थिती-
सोमवार ते शुक्रवारदरम्यान संध्याकाळी ५ ते ६ या वेळेत संबंधित डिपोचे सुपरवायझर युनिफॉर्ममध्ये मुख्य बसस्थानकांवर किंवा विद्यार्थ्यांची सर्वाधिक ये-जा असलेल्या स्टॉपवर उभे राहणार आहेत. शाळेतील शेवटचा विद्यार्थी सुरक्षित घरी बसने रवाना होईपर्यंत सुपरवायझरला त्या ठिकाणाहून हलता येणार नाही, असा कडक आदेश देण्यात आला आहे.
तक्रारी सिद्ध झाल्यास निलंबनाची कारवाई-
मंत्री सरनाईक यांनी एसटीच्या महाव्यवस्थापकांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की,
विद्यार्थी, पालक, शाळेचे मुख्याध्यापक किंवा कॉलेजचे प्राचार्य यांनी बस रूटवरील अव्यवस्थेबाबत लिखित तक्रार केल्यास आणि त्यातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान सिद्ध झाल्यास
संबंधित सुपरवायझर किंवा अधिकाऱ्यांना निलंबित करणे किंवा विद्यार्थ्याचा जितक्या दिवसांचा अभ्यास बिघडला तितक्या दिवसांच्या रजेवर पाठवणे, अशी कठोर कारवाई केली जाईल.
या हेल्पलाईनमुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित व व्यवस्थित प्रवासाची हमी मिळेल, असा विश्वास परिवहन विभागाने व्यक्त केला आहे.









