
नागपूर : शहरातील खासदार सांस्कृतिक महोत्सवात घडलेली मारहाणीची घटना नागपूरकरांना हादरवून गेली आहे. रविवारी (१६ नोव्हेंबर) सायंकाळी श्रेया घोषालच्या कॉन्सर्टसाठी मोठी गर्दी जमली होती. एंट्रीसाठी रांगेत असताना झालेल्या किरकोळ धक्का–मुक्कीनंतर परिस्थिती अचानक बिघडली आणि नंदनवन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विनायक कोळी यांनी भारतीय सेनेचे नायक गिरीश येलेकर यांना कथितरित्या बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीचा वाद अगदी तुच्छ होता. मात्र पाहता पाहता तो ताणला गेला आणि पीआय कोळी यांनी जवानावर हात उगारला. या हल्ल्यात येलेकर यांचा हात फ्रॅक्चर झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेदरम्यान हस्तक्षेप करण्यासाठी पुढे आलेल्या त्यांच्या पत्नीला देखील ढकलण्यात आले तसेच तिच्याशी अवमानकारक भाषेत बोलल्याचा आरोपही नोंदवण्यात आला आहे.
घटनेनंतर परिसरात तीव्र नाराजी पसरली असून नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. “देशासाठी लढणाऱ्या जवानाला स्वतःच्या शहरातही सुरक्षितता नाही का?” असा सवाल सर्वत्र उपस्थित केला जात आहे.
या घटनेची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी वेगाने वाढू लागली आहे. नागपूर पोलिसांवर लक्ष केंद्रीत झाले असून प्रशासनाची पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.









