
नागपूर — खापरखेडा पोलिस स्टेशन हद्दीत शुक्रवारी सकाळी घडलेल्या हादरवून टाकणाऱ्या अपघातात आई आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. जयभोले नगरातील निर्मला उत्तम सोनटक्के (५१) आणि तिचा मुलगा लोकेश उत्तम सोनटक्के (३१) यांचा विद्युतप्रवाह लागून मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घटनेची सविस्तर माहिती अशी की, निर्मला सोनटक्के घराबाहेर लावलेल्या लोखंडी तारेवर कपडे टांगत होती. त्या तारेचा संपर्क अचानक वरून गेलेल्या वीजवाहिनीशी आला आणि ती प्राणघातक विद्युतप्रवाहाने भाजली. तिच्या किंकाळ्या ऐकून नाईट शिफ्ट संपवून नुकताच घरी परतलेला मुलगा लोकेश झोपेतून उठून बाहेर आला. आईला वाचवण्यासाठी तो तत्काळ पुढे सरसावला, परंतु तिला हात लावताच त्यालाही विद्युतप्रवाहाचा तीव्र धक्का बसला.
दोघेही जागीच निष्प्राण झाले. नागरिकांनी तत्काळ खापरखेडा पोलिसांना याची खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनाही सूचना करून विद्युतपुरवठा तातडीने खंडित करण्यात आला.
या दुर्दैवी प्रसंगाने जयभोले नगरात शोककळा पसरली असून स्थानिकांनी धोकेदायक ओव्हरहेड लाईनबाबत प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेऊन तपास सुरू केला आहे.









