नागपूर : नगर पालिका व नगर परिषदा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात तणाव वाढत आहे. विविध पक्षांनी स्वतंत्रपणे उमेदवार उभे केले असून, बंडखोर उमेदवारांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मतविभाजनाचा धोका वाढल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
याबाबत शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील यांनी आरोप केला आहे की, मतविभाजन टाळण्यासाठी काँग्रेस आणि भाजपकडून त्यांच्या उमेदवारांना निवडणूक रिंगणातून मागे हटण्यास धमक्या देण्यात येत आहेत. त्यांनी पुढे सांगितले की, सावनेरमधील काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार, कामठी विधानसभा मतदारसंघातील महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि रामटेक विधानसभा मतदारसंघातील अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या परिसरातील राष्ट्रवादी उमेदवारांना विशेषतः या धमक्या मिळत आहेत.
कुंटे पाटील म्हणाले की, धमक्या देणाऱ्यांविरुद्ध नावाने पोलिसात तक्रार केली जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडीतील इतर घटकांसोबत युती करून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला होता, पण काँग्रेसने सहकार्य नाकारल्यामुळे राष्ट्रवादी स्वतंत्रपणे आणि काही मित्रपक्षांसह निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
आता अनेक जागांसाठी उमेदवारांची संख्या दुप्पट झाली असून बंडखोर उमेदवारांचीही मोठी संख्या आहे. त्यामुळे मतविभाजनाचा धोका प्रबल झाला आहे. शुक्रवारी उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने दबाव वाढल्याचेही कुंटे पाटील यांनी स्पष्ट केले.









