
भंडारा – तुमसर शहराला हादरवून सोडणारी एक भीषण घटना समोर आली आहे. गोवर्धन नगर परिसरातील रेल्वे रुळांलगत असलेल्या नाल्यात आज सकाळी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली. गळा चिरून हत्या केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
नाल्यात रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह-
स्थानिकांना नाल्यात एका व्यक्तीचा हालचाल नसलेला देह दिसताच त्यांनी ताबडतोब पोलिसांना कळवले. मृताच्या गळ्यावर खोल जखमा दिसत असून धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून करण्यात आल्याचे अंदाज व्यक्त केले जात आहेत. घटनास्थळावर रक्ताचे डाग मोठ्या प्रमाणावर आढळले.
ओळख पटली नाही; परिसरात दहशतीचं वातावरण-
हत्येची माहिती क्षणात परिसरात पसरताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी उसळली. अज्ञात व्यक्तीची हत्या झाल्याच्या घटनेनं गोवर्धन नगरसह तुमसर शहरात भीतीचं सावट निर्माण झालं आहे. मृत व्यक्ती कोण आणि या हत्येमागचं कारण काय, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
पोलीस तातडीने दाखल, तपास सुरू-
घटनेची माहिती मिळताच तुमसर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करत तपासाची दिशा विविध कोनातून सुरू केली आहे.
या हत्याकांडामुळे भंडाऱ्यात पुन्हा एकदा सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.









