नागपूर : पांढराबोडी परिसरातील मनपाच्या मालकीच्या दोन जमिनींवर दीर्घकाळापासून चालू असलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणाला अखेर पोलिसांनी लक्ष घातले असून अंबाझरी पोलिस ठाण्यात महेंद्र पुरुषोत्तम जिचकार आणि नरेंद्र पुरुषोत्तम जिचकार या दोन भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनपा धरमपेठ झोन-2 येथील कनिष्ठ अभियंता पुंडलिक मानिकराव ढोरे यांनी दिलेल्या लेखी तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.
तक्रारदारांनी दिलेल्या माहितीनुसार मौजा पांढराबोडी येथील खसरा क्रमांक 15 आणि नगर भूमापन क्रमांक 50 अंतर्गत असलेली मनपाची जमीन—ज्यात मुख्य भूखंड आणि शिवार पाधनाचा भाग समाविष्ट आहे—या दोन्ही जागांवर 2016 पासून दोन्ही भावांनी अनधिकृतरित्या कब्जा ठेवला होता. मनपेकडून वारंवार नोटिसा देऊनही अतिक्रमण न काढल्यामुळे अखेर कारवाईसाठी पोलिसांकडे धाव घ्यावी लागली.
महानगरपालिकेच्या आयुक्तांनी 7 नोव्हेंबर रोजी दिलेल्या निर्देशानंतर ही जमीन मनपाची असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आणि त्यानंतर झोन कार्यालयाने झालेल्या अतिक्रमणाचा संपूर्ण तपशील पोलिसांना पाठवला. पोलिसांनी FIR क्रमांक 533/2025 नोंदवून भारतीय न्याय संहिता 2023 च्या संबंधित कलमान्वये दोन्ही भावांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रात्री दाखल झालेल्या या गुन्ह्याचा तपास निरीक्षक विनोद गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
मनपाच्या मालकीवर दशकभर चाललेले हे अतिक्रमण अधिकाऱ्यांच्या कारवाईनंतर उघडकीस आले असून पुढील तपासात अतिक्रमणाचा स्वरूप, वापरलेली कागदपत्रे, तसेच कब्जा किती काळ ठेवला याचे सविस्तर पडताळणी केली जाणार आहे.










