
नागपूर– bगुमगावातील शांत बाजारपेठ सोमवारी मध्यरात्री गोंधळात बदलली, जेव्हा अज्ञात चोरट्यांनी एकामागून एक अशा सात दुकानांचे शटर उचकावून चोरी केली. या धाडसी प्रकाराने परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे.
पोलीस सूत्रांनुसार, वर्मा ज्वेलर्स या दुकानातून सुमारे ₹4 लाख किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड चोरट्यांनी लंपास केली. याशिवाय श्रीराम फुसे यांची किराणा दुकान, सागर आणि राजेंद्र कुबडे यांची हार्डवेअर दुकाने, तसेच जागेश्वर झाडे, बापू भुसारी आणि मधुकर हुलके यांच्या दुकानांमध्येही चोरांनी हात साफ केला आहे.
CCTV निष्क्रिय करण्यासाठी हुशारीचा वापर-
घटनेची माहिती मिळताच ठाणेदार जितेंद्र बोबडे आणि उपनिरीक्षक संतोष राठोड यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक चौकशीत उघड झाले की चोर मोटरसायकलवर आले होते. त्यांनी CCTV कॅमेऱ्यांपासून वाचण्यासाठी छत्रीचा आधार घेतला, तर काही कॅमेऱ्यांवर काळा स्प्रे मारून ते निष्क्रिय केले.
तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपासाला वेग-
पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आसपासच्या CCTV फुटेजची तपासणी सुरू केली आहे. तांत्रिक साक्षांमधून काही प्राथमिक धागेदोरे मिळाले असून, आरोपींचा शोध सुरू आहे.
व्यापाऱ्यांमध्ये भीती, पोलिस गस्त वाढवण्याची मागणी-
गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक व्यापार संघटनांनी पोलिस प्रशासनाकडे रात्रगस्त वाढवण्याची आणि सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याची मागणी केली आहे.










