
नवी दिल्ली : लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर देशभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असताना चौकशीतून हादरवणारे खुलासे समोर आले आहेत. तपास यंत्रणांच्या प्राथमिक माहितीनुसार, दिल्ली हा दहशतवाद्यांचा मूळ टार्गेट नव्हता, तर अयोध्येतील श्रीराम मंदिर आणि वाराणसीतील पवित्र स्थळे उद्ध्वस्त करण्याचा त्यांचा मोठा कट होता.
तपासात उघड झाले आहे की, या स्फोटाची योजना अनेक दिवसांपासून रचली जात होती. मात्र, अयोध्येतील नियोजित स्फोट घडवण्यापूर्वीच परिस्थिती बिघडल्याने दिल्लीमध्ये घाईघाईत स्फोट घडवण्यात आला. स्फोटात वापरलेले साहित्य बांगलादेश आणि नेपाळमार्गे भारतात आणले गेले असल्याचं समोर आलं आहे.
अयोध्या आणि वाराणसीला लक्ष्य-
सुरक्षा एजन्सींच्या चौकशीतून उघड झाले की, अटक केलेल्या दहशतवाद्यांनी अयोध्या आणि वाराणसीतील धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्याची मोठी योजना आखली होती. यासाठी त्यांनी स्वतंत्र मॉड्यूल तयार केले होते. शाहीन नावाच्या एका महिलेनं अयोध्येत स्लीपर सेल सक्रिय केल्याचंही समोर आलं आहे. मात्र, हल्ला घडवण्याआधीच या टोळीला अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडून स्फोटके जप्त करण्यात आली.
स्फोट घाईघाईत – टायमरचा वापर नव्हता-
तपासातून हेही स्पष्ट झाले आहे की, स्फोटकांमध्ये टायमर नव्हता. हा स्फोट अत्यंत घाईघाईत करण्यात आला. आरोपी उमर हा गाडी चालवत होता, आणि स्फोटाच्या वेळी ती गाडी लाल किल्ल्याजवळ सुमारे तीन तास उभी होती.
स्फोटकांचा मोठा साठा अद्याप शोधात-
एजन्सींना आतापर्यंत २,९०० किलो स्फोटके जप्त करण्यात यश आले आहे, मात्र अजून सुमारे ३०० किलो अमोनियम नायट्रेटचा साठा गायब असल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवाद्यांकडून त्याचा मागोवा घेण्यासाठी कसून चौकशी सुरू आहे.
स्फोट झालेल्या i-20 गाडीचा संपूर्ण मार्ग, ती कुठे-कुठे थांबली होती आणि स्फोटके नेमकी कुठे भरण्यात आली, याचा शोध तपास यंत्रणा घेत आहेत. देशभरात एकाचवेळी छापेमारी सुरू असून, सुरक्षा यंत्रणा सतत सतर्क आहेत.










