
नागपूर : हनुमाननगर येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर सुरू असलेल्या ‘खासदार सांस्कृतिक महोत्सव–२०२५’ च्या पाचव्या दिवसाची सायंकाळ हशा-ठट्टेने रंगून गेली. लोकप्रिय टीव्ही शो *‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’*तील कलाकारांनी आपले खास प्रहसन आणि भन्नाट अभिनय सादर करत रसिकांना पोट धरून हसवले.
या हास्यसंध्येत प्राजक्ता माळी, सई ताम्हणकर, प्रसाद ओक, समीर चौगुले, नम्रता संभेराव, पृथ्वीक प्रताप, रोहित माने, वनिता खरात, रसिका वेंगुर्लेकर आणि प्रभाकर मोरे या कलाकारांनी धमाल उडवली.
लाल साडीत देखणी दिसणारी प्राजक्ता माळी आणि जांभळ्या पारंपरिक पेहरावात मंचावर अवतरलेली सई ताम्हणकर यांचं आगमन होताच प्रेक्षकांनी टाळ्यांचा वर्षाव केला. सईने वऱ्हाडी बोलीत सुरुवात करताच सभागृहात हशा पिकला.
“नागपूर म्हणजे दिलाच्या अगदी जवळचं ठिकाण… इथले तर्री पोहे आणि सावजी रस्सा ऐकूनच भूक लागते,” असं म्हणत तिने नागपूरकरांची मने जिंकली.
त्यानंतर पुण्याच्या पाणीपुरी विरुद्ध विदर्भाच्या गुपचुपवर रंगलेल्या गमतीशीर संवादांमुळे हास्याचे फवारे उडाले. “विदर्भात काहीही गुपचुप राहत नाही, सगळं खुलं असतं.नितीन गडकरींसारखं!” या वाक्यावर सभागृहात जोरदार टाळ्या वाजल्या.
पृथ्वीक प्रताप, रोहित माने, वनिता खरात, रसिका वेंगुर्लेकर आणि प्रभाकर मोरे यांच्या स्किटने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. डॉ. प्रसाद खांडेकरच्या एन्ट्रीनं तर हास्याचा रसभरित माहोल तयार केला.
दरम्यान, नम्रता संभेराव आणि समीर चौगुले यांनी सादर केलेल्या ‘रस्ता सुरक्षा’ विषयावरच्या प्रहसनातून सामाजिक संदेश देतानाच प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडलं.
सुरुवातीला “देवा श्रीगणेशा” या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली, त्यानंतर चैतन्य देवडेच्या “लख्ख पडला प्रकाश मशालीचा” या गाण्याने वातावरण भारावले.
या प्रसंगी केंद्रीय मंत्री आणि महोत्सवाचे प्रणेते श्री. नितीन गडकरी यांच्यासह कांचनताई गडकरी, माहिती आयुक्त गजानन निमदेव, लोकमतचे श्रीमंत माने, महाराष्ट्र टाईम्सचे श्रीपाद अपराजित, सकाळचे प्रमोद काळबांडे, पुण्यनगरीचे रमेश कुलकर्णी आणि नवराष्ट्रचे संदीप भारंबे या मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून पारंपरिक पद्धतीने कार्यक्रमाला सुरुवात झाली.
आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष डॉ. गौरीशंकर पाराशर, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, तसेच योगेश बन, अॅड. नितीन तेलगोटे आणि आशिष वांदिले यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे संचालन बाळ कुलकर्णी आणि रेणुका देशकर यांनी केले. सुरुवातीला दिल्लीतील दुःखद स्फोटातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.दिल्लीतील दुर्घटना अत्यंत वेदनादायी असून अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये,” अशी भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.हा स्याने भारलेली ही संध्या नागपूरकरांसाठी अविस्मरणीय ठरली.“खासदार सांस्कृतिक महोत्सवा”तील हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने हास्यजत्रेचा महोत्सव ठरला.











