
नागपूर : इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या रामबाग आणि इंदिरा नगर झोपडपट्टी भागात शुक्रवारी सायंकाळी पुन्हा एकदा भीतीचे सावट पसरले. काही वर्षांपूर्वी कुख्यात गुंड म्हणून ओळखला जाणारा ताराचंद खिल्लारे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गुन्हेगारी जगातून दूर गेल्याचा दावा करणारा खिल्लारे आता प्रॉपर्टी व्यवहार आणि अवैध सावकारीच्या धंद्यात सक्रीय झाला असून, त्याची पूर्वीची दादागिरीची पद्धत आजही तशीच सुरू आहे.
शुक्रवारी झालेल्या अवैध सावकारी वादातून झालेल्या हल्ल्याने परिसर हादरला. खिल्लारेने आपल्या नात्या हनी कैथवास (21) आणि त्याच्या मित्राच्या मदतीने सुभाष उके (40) या व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केला. लोखंडी रॉड आणि फायटरने करण्यात आलेल्या हल्ल्यात सुभाष गंभीर जखमी झाला, तसेच त्याची कार देखील फोडण्यात आली. हल्ल्यानंतर आरोपी पसार झाले, तर परिसरात गोंधळ माजला.
मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी सुभाषने हनीच्या आईकडून काही रक्कम उसने घेतली होती. व्याजासह पैसे परत करण्यावरून दोघांमध्ये वाद सुरू होता. शुक्रवारी हनी काही साथीदारांसह सुभाषकडे पैसे मागण्यासाठी पोहोचला, परंतु बोलाचालीतून वाद पेटला. त्याचवेळी खिल्लारे स्वतः घटनास्थळी आला आणि सुभाषला थप्पड मारत जमिनीवर पाडले, त्यानंतर मारहाण सुरू झाली, अशी माहिती स्थानिकांनी दिली.

ताराचंद खिल्लारे
स्थानिक नागरिकांनी खिल्लारे टोळीविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, तो परिसरातील लोकांना धमकावून पैसे वसूल करतो, आणि त्याच्या भीतीने कोणी तक्रार देण्यासही धजावत नाही. नागरिकांनी पोलिसांवरही नाराजी व्यक्त करत म्हटले की, “पोलिसांना सर्व माहीत असूनही ते काही कारवाई करत नाहीत.”
सध्या पोलिसांनी या घटनेत दोन्ही पक्षांवर गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. मात्र स्थानिक नागरिकांचा एकच प्रश्न कायम आहे.इमामवाड्यातील गल्लीबोळातून ताराचंद खिल्लारेची दहशत अखेर केव्हा संपेल?









