
नागपूर : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर पुण्यातील महार वतनच्या सरकारी जमिनीच्या अवैध विक्रीत सहभागी असल्याचा गंभीर आरोप केला आहे. वडेट्टीवार यांनी हा व्यवहार फसवणुकीचा प्रकार असल्याचे सांगत संबंधितांवर भा.दं.सं. कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
सरकारी जमीन विक्री कशी झाली?
वडेट्टीवार यांनी आरोप केला की, सुमारे ३०० कोटी रुपयांच्या या व्यवहारात सरकारी जमीन खाजगी हातांमध्ये कशी गेली, हा मोठा प्रश्न आहे. त्यांनी सांगितले की ही जमीन मूळ ३०० वारसदारांच्या (महार वतनदारांच्या) नावावर परत करण्यात यावी, कारण मालकी हक्क त्यांचाच आहे. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, “जेव्हा सातबारा उताऱ्यावर जमीन सेंट्रल ऑफिसच्या नावावर होती, तेव्हा विक्री कशी काय झाली?”
पावर ऑफ अटर्नीवरून गैरव्यवहाराचा आरोप-
या प्रकरणात तेजवानी नावाच्या व्यक्तीवर वडेट्टीवार यांनी बोट ठेवले आहे. त्यांनी म्हटले की, “तेजवानीने मूळ मालकांना विश्वासात न घेता केवळ पावर ऑफ अटर्नीच्या आधारावर जमीन विकली. ही कृती पूर्णपणे बेकायदेशीर आहे.”
ईडी आणि सीबीआयवरही प्रश्नचिन्ह-
वडेट्टीवार यांनी या व्यवहारात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा दावा करत म्हटले, “हे सरकारशी सरळ फसवणुकीचे प्रकरण आहे. मग ईडी आणि सीबीआय गप्प का आहेत? त्यांनी याची चौकशी करावी.”
२१ कोटींची स्टॅम्प ड्युटी माफ-
काँग्रेस नेत्यांनी आणखी एक गंभीर आरोप केला की, या व्यवहारात २१ कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आली. एका आयटी कंपनीच्या नावावर ३०० कोटींचा व्यवहार दाखवून केवळ ५०० रुपयांच्या बाँडवर करार करण्यात आला. कंपनीला आयटी पार्कच्या प्रस्तावाच्या नावाखाली मोठी करसवलत देण्यात आली.
पुण्यात चौकशी झाली तर लाख कोटींचा घोटाळा उघड होईल-
वडेट्टीवार म्हणाले, “पुण्यात अशा पन्नासहून अधिक प्रकरणांची माहिती आमच्याकडे आली आहे. या सर्वांमध्ये सरकारी महसुलाला मोठे नुकसान झाले आहे. चौकशी झाली तर लाख कोटींचा घोटाळा समोर येईल.त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट विचारले “सत्ता वाचवण्यासाठी हे प्रकरण दडपले जाणार आहे का, की खरोखर कारवाई होणार?









