
मुंबई :राज्यातील राजकीय वर्तुळात सध्या शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे. एका कार्यक्रमात त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘महिलांच्या मनातील मुख्यमंत्री’ असे संबोधत अनपेक्षित विधान केले.
डॉ. गोऱ्हे यांच्या ‘दहा दिशा’ या पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला मंत्री चंद्रकांत पाटील आणि उदय सामंत उपस्थित होते. यावेळी गोऱ्हे म्हणाल्या, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आम्हाला मनापासून आदर आहे. मात्र ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे एकनाथ शिंदे हे महिलांच्या मनातील मुख्यमंत्री ठरले आहेत.”
त्या पुढे म्हणाल्या, “राजकारणात महिलांना आज स्थान मिळाले आहे, पण त्यांचे सक्षमीकरण आणि सुरक्षिततेचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. मुख्यमंत्री शिंदे यांनी महिलांसाठी ज्या योजना राबवल्या, त्याचा प्रभाव थेट समाजाच्या मनावर पडला आहे.”
फडणवीस यांची विनोदी प्रतिक्रिया-
नीलम गोऱ्हे यांच्या या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हलक्याफुलक्या अंदाजात प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “शिंदे आणि मी मुख्यमंत्रिपदाची अदलाबदल करत असतो. कधी मी, कधी ते. जर पुन्हा शिंदेंना मुख्यमंत्री बनवले तरी धोका नाही, कारण ते नंतर खुर्ची मला परत देतील.”
स्थानिक निवडणुकांपूर्वी युतीचा नवा फॉर्म्युला-
दरम्यान, राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर सत्ताधारी महायुतीकडून तयारी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट एकत्र आहेत. निवडणूकपूर्व आघाडी नसली तरी निवडणुकीनंतर युती कायम राहील.”
राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबरला मतदान होणार असून, मतमोजणी ३ डिसेंबर रोजी केली जाणार आहे. तर २९ महानगरपालिका, ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही.
महिलांच्या मनात शिंदेंचे स्थान अधिक घट्ट-
डॉ. गोऱ्हे यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेषतः ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महिलांच्या मनात एकनाथ शिंदेंबद्दल निर्माण झालेला विश्वास आणि आपलेपणा अधोरेखित झाल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.









