
मुंबई : राज्यातील होतकरू पण आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र सरकारकडून एक अभिनव योजना समोर आली आहे. इंजिनियरिंग (JEE) आणि मेडिकल (NEET) क्षेत्रात करिअर करण्याची स्वप्नं पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना आता कोचिंगचा खर्च अडथळा ठरणार नाही. कारण राज्य शासन या विद्यार्थ्यांचा संपूर्ण तयारीचा खर्च स्वतः उचलणार आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने ‘सुपर-50’ ही नवी योजना प्रस्तावित केली असून, याअंतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील 50 गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना पुढील दोन वर्षांसाठी JEE आणि NEET परीक्षेचे मोफत प्रशिक्षण देण्यात येईल.
ही योजना खास करून दहावी उत्तीर्ण होणारे आणि विज्ञान शाखेला प्रवेश घेणारे विद्यार्थी यांच्यासाठी असणार आहे. निवड प्रक्रियेसाठी दहावी नंतर शासनाकडूनच स्वतंत्र परीक्षा घेतली जाईल. या परीक्षेच्या गुणांच्या आधारे प्रत्येक जिल्ह्यातील 50 विद्यार्थी निवडले जातील आणि त्यांना उच्च दर्जाच्या कोचिंग संस्थांमधून प्रशिक्षण मिळेल.
महत्वाचे म्हणजे, या योजनेचा लाभ फक्त दोन लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. म्हणजेच ही योजना गरजू पण प्रतिभावान विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.
माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे चे संचालक महेश पालकर यांनी सांगितले की, “ही स्वतंत्र परीक्षा शासनाच्याच माध्यमातून घेतली जाणार असून, यात गुणांच्या आधारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना JEE आणि NEET दोन्ही परीक्षांची तयारी करण्याची संधी मिळेल. कोचिंगचा संपूर्ण खर्च शासन उचलणार आहे.”
याशिवाय, यावर्षी अकरावी सायन्स शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या योजनेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे दहावी आणि अकरावीतील प्रत्येकी 50 विद्यार्थी, म्हणजे एकूण 100 विद्यार्थ्यांना राज्य सरकारकडून मोफत कोचिंग मिळणार आहे.
‘सुपर-50’ योजनेचा प्रस्ताव सध्या सरकारकडे विचाराधीन असून, मंजुरी मिळाल्यानंतर लवकरच ही योजना राज्यभर सुरू होणार आहे. शिक्षण क्षेत्रातल्या या निर्णयामुळे अनेक होतकरू विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होणार, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.









