
मुंबई: महाराष्ट्र सरकार आणि एलॉन मस्क यांच्या ‘स्टारलिंक सॅटेलाईट इंटरनेट प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीदरम्यान अत्यंत महत्त्वाचा करार झाला आहे. या करारामुळे महाराष्ट्र राज्यात उपग्रह तंत्रज्ञानावर आधारित सुपरफास्ट इंटरनेट सेवा लवकरच सुरू होणार आहे. देशात अशा प्रकारची भागीदारी करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार आहे.
मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ‘स्टारलिंक’च्या उपाध्यक्ष लॉरेन ड्रेयर यांच्या उपस्थितीत हा करार झाला. या भागीदारीअंतर्गत राज्यातील गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव आणि वाशिम यांसारख्या दुर्गम भागांमध्ये उपग्रह तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उच्चगती इंटरनेट सेवा पुरवली जाणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या संधीबाबत सांगितले, “स्टारलिंकसोबतचा हा करार महाराष्ट्राच्या डिजिटल विकासात एक नवा टप्पा आहे. आता राज्यातील सर्व भागांत, अगदी शेवटच्या गावांपर्यंत वेगवान आणि विश्वासार्ह इंटरनेट सेवा पोहोचवण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.”
एलॉन मस्क यांच्या स्टारलिंककडे जगातील सर्वात मोठा उपग्रह नेटवर्क असून, या उपग्रहांच्या माध्यमातून ग्रामीण भागांसाठी इंटरनेट सेवा प्रथमच उपलब्ध होणार आहे. या योजनेमुळे राज्यातील शासकीय शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामपंचायती आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांना मोठा फायदा होईल.
याशिवाय, उपग्रहाधारित इंटरनेटमुळे इलेक्ट्रिक वाहन प्रकल्प, किनारपट्टी विकास, हवामान नियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक प्रभावीपणे चालवता येणार आहे, असे प्रशासनाने सांगितले आहे.
माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महाराष्ट्राने पुन्हा एकदा आघाडी घेत ‘स्मार्ट कनेक्टेड महाराष्ट्र’कडे महत्वाचा टप्पा पार केला आहे. एलॉन मस्क यांच्या कंपनीसोबत झालेल्या या करारामुळे राज्याचा डिजिटल भविष्यासाठी मजबूत पाया तयार होईल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.









