
नागपूर – गंगाबाई घाट परिसरात भिक मागून उपजीविका करणाऱ्या एका तरुणाचा त्याच्याच दारूड्या मित्राने निर्दयपणे खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोस्टमार्टम अहवालातून या धक्कादायक घटनेचा पर्दाफाश झाला. कोतवाली पोलिसांनी आरोपी देवराव भजनलाल यादव (वय २८, रा. छिंदवाडा, मध्य प्रदेश) याला अटक केली आहे. मृताची ओळख सूरज शंकर मेश्राम (वय ३५, रा. कार्पोरेशन कॉलनी, गंगाबाई घाट) अशी झाली आहे.
दारूच्या नशेत वाद, आणि मृत्यूचा खेळ-
पोलिसांच्या माहितीनुसार, सूरज आणि देवराव हे दोघेही गंगाबाई घाट भागात सफाईचे काम तसेच भिक मागून जगत होते. २५ ऑक्टोबरच्या रात्री दोघांनी घाटाजवळील विसावा ठिकाणी बसून दारू पिण्याचा कार्यक्रम केला. नशा वाढल्यानंतर किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. तो वाद शिवीगाळीतून थेट मारहाणीपर्यंत पोहोचला.
रागाच्या भरात देवरावने जवळ असलेल्या झाडूच्या लोखंडी पाईपने सूरजच्या डोक्यावर जबर प्रहार केला. सूरज घटनास्थळीच कोसळला आणि काही वेळ तडफडत राहिला. त्याच्या डोक्यातून सतत रक्तस्राव होत होता. स्थानिकांनी जेव्हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला सूरज पाहिला, तेव्हा तात्काळ कोतवाली पोलिसांना कळविण्यात आले.
उपचारादरम्यान मृत्यू, पोस्टमार्टमने उघडले रहस्य-
जखमी सूरजला तातडीने मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, ३० ऑक्टोबर रोजी त्याचा मृत्यू झाला. सुरुवातीला पोलिसांनी याला अपघाती मृत्यू समजून नोंद केली होती. पण पोस्टमार्टम अहवालात सूरजच्या डोक्यावर खोल जखम झाल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संपूर्ण चित्र बदलले.
पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. चौकशीत आरोपी देवरावने सुरुवातीला अज्ञान दाखविले, मात्र प्रत्यक्षदर्शींच्या साक्षी आणि पुराव्यांमुळे त्याचा गुन्हा सिद्ध झाला आणि अखेर पोलिसांनी त्याला अटक केली.
शहरातील वाढत्या हत्यांमुळे पोलिस सतर्क-
गंगाबाई घाटातील ही घटना शहरात गेल्या काही दिवसांत घडलेल्या पाचव्या हत्येची नोंद ठरली आहे. याआधी पारडी भागात दोन, तर कपिल नगर आणि एमआयडीसी परिसरात प्रत्येकी एक हत्या झाली आहे. सलग घडणाऱ्या या घटनांनी पोलिस प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. वरिष्ठ अधिकारी आता या वाढत्या हिंसक घटनांवर कठोर नजर ठेवत आहेत.









