
नागपूर : नागपूरचा विकास अधिक वेगवान, समतोल आणि शाश्वत करण्यासाठी तीन प्रमुख घटकांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे – सक्षम परिवहन व्यवस्था, गुणवत्तापूर्ण शिक्षण व आरोग्य सेवा, आणि आधुनिक पायाभूत सुविधा. या त्रिसूत्रीच्या आधारे नागपूरला ‘स्मार्ट’ आणि ‘सस्टेनेबल सिटी’ बनविण्याचा निर्धार महसूल व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.
जिल्हा नियोजन भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी मनपा आयुक्त अभिजित चौधरी, एनएमआरडीएचे सभापती संजय मीणा, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी उपस्थित होते.
बावनकुळे म्हणाले की, नागपूर आणि परिसराचा प्रवास अधिक सुलभ व प्रदूषणमुक्त करण्यासाठी एकात्मिक वाहतूक आराखडा तयार करण्यात आला आहे. मेट्रो आणि मनपा बससेवा यांचा समन्वय साधत, ग्रामीण हद्दीत ई-बसेसच्या माध्यमातून पर्यावरणपूरक वाहतूक सुरू करण्यात आली आहे. सध्या २५० ई-बसेस कार्यरत असून, ती संख्या लवकरच ६५० वर नेण्यात येणार आहे.
नागपूर जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ७५ हजार घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, पात्र लाभार्थ्यांना घरे वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. महसूल विभागाच्या ई-नझूल प्रणालीमुळे नागरिकांना जमीनसंबंधी कामकाजासाठी सरकारी कार्यालयात जाण्याची गरज उरलेली नाही, असेही त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागात महिलांच्या सक्षमीकरणासाठी बचतगटांना बीजभांडवल वाटप, आधुनिक अंगणवाड्या, हेल्थ वॉर रूम आणि एआय-आधारित शिक्षण प्रकल्प अशा उपक्रमांद्वारे ग्रामीण विकासाचा नवा अध्याय लिहिला जात असल्याचे बावनकुळे म्हणाले.
जिल्ह्यात १,१५० किलोमीटर पाणंद रस्ते तयार करण्यात आले असून, त्यात फ्लाय अॅशचा वापर करून पर्यावरणपूरक रस्ता विकास साधला गेला आहे. यामुळे नागपूर जिल्हा टिकाऊ विकासाच्या दिशेने अग्रणी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रस्त्यांवरील मोकाट जनावरांच्या समस्येवर उपाय म्हणून देशातील पहिला ‘नंदग्राम प्रकल्प’ नागपूर जिल्ह्यात सुरू होणार असल्याचेही बावनकुळेंनी सांगितले. या प्रकल्पातून जनावरांची काळजी, दुग्ध व्यवसायाचा विकास आणि पर्यावरणपूरक उपक्रमांना चालना मिळेल.
बावनकुळे यांनी मांडलेली ही ‘त्रिसूत्री’ योजना नागपूरला केवळ स्मार्ट सिटी नव्हे, तर भारताच्या शाश्वत विकासाच्या आदर्श मॉडेलमध्ये परिवर्तित करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
			



    
    




			
			