
मुंबई : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांचा महत्त्वाचा अध्याय लवकरच सुरू होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्य निवडणूक आयोगाने तीन टप्प्यांत निवडणुका घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यात मतदान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यातील २९ महानगरपालिका, २४६ नगर परिषद, ३२ पंचायत समित्या आणि ४२ जिल्हा परिषदांसाठी मतदान होणार आहे. आयोगाने प्राथमिक आराखडा तयार केला असून, पहिल्या टप्प्यात महानगरपालिका, दुसऱ्या टप्प्यात नगर परिषद आणि तिसऱ्या टप्प्यात पंचायत समित्या व जिल्हा परिषद निवडणुका घेण्याचा विचार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारीपर्यंत सर्व स्थानिक निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिल्याने, राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्ह्यांकडून तयारीचा अहवाल मागविला आहे. शीतकालीन अधिवेशनानंतर निवडणुकीचा बिगुल वाजण्याची पूर्ण शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, राज्यातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांनीही आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजप, काँग्रेस, शिवसेना (दोन्ही गट), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इतर दलांनी संभाव्य उमेदवारांची नावे ठरविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
शहर ते जिल्हा पातळीवर बुथस्तरीय बैठका, सोशल मीडिया प्रचार मोहीम, प्रचार समित्यांचे गठन यासह निवडणूक वातावरण तापू लागले आहे. दरम्यान, मतदार यादी सुधारणा, आरक्षण प्रक्रिया आणि मतदान कर्मचाऱ्यांची नियुक्ती या बाबींवरही प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे.
राज्यातील जनतेचे लक्ष आता आयोगाच्या पुढील घोषणेकडे लागले असून, नव्या वर्षाच्या प्रारंभीच महाराष्ट्रात राजकीय रणधुमाळी पेटण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
			


    
    




			
			