
नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आंदोलन पेटलेलं असताना, प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी आज सरकारला थेट इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्ट केलं की शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील. “सरकारने घोषणा केली खरी, पण फक्त घोषणा पुरेशी नाही; पैसा दिसला पाहिजे, तेव्हाच आम्ही शांत बसू,” असं ते ठामपणे म्हणाले.
कडूंनी सरकारच्या दुटप्पी भूमिकेवरही टीका केली. “मुख्यमंत्री म्हणतात कर्जमाफी करू, तर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात आम्ही कर्जमाफीबाबत काही बोललोच नाही. जनतेला दिशाभूल करण्याचं हे राजकारण आम्ही सहन करणार नाही,” असा आरोप त्यांनी केला. पुढे ते म्हणाले की, “आता आम्ही त्यांना तारीख ठरवायला भाग पाडलं आहे. सरकारने खरंच शेतकऱ्यांच्या भल्यासाठी निर्णय घेतला असेल, तर त्याचं स्वागत. पण जर या सगळ्याच्या मागे काही साजिश असेल, तर आम्ही कोणालाही सोडणार नाही.”
बच्चू कडूंनी भावनिक सूर धरत सांगितलं, “शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आम्ही रस्त्यावर आहोत. आमच्यावर आरोप करणाऱ्यांना काही सांगायचं नाही. जर शेतकऱ्यांसोबत अन्याय झाला, तर मी स्वतः फाशीला तयार आहे. पण आता मागे हटणार नाही.”
त्यांनी कराले मास्टरांचा उल्लेख करत म्हटलं, “त्यांना बैठकीला यायचं होतं, पण आले नाहीत. त्यांना काही त्रास नसेल, तरी मी त्यांना भेटणार आहे. आज काही लोक सोशल मीडियावरून आंदोलनकर्त्यांना दोष देतायत, हे पाहून वाईट वाटतं. ज्यांनी कधी घराबाहेर पडून लढा दिला नाही, ते आज आम्हाला शिकवतात.”
कर्जमाफीबाबत बोलताना कडूंनी सांगितलं की मार्च २०२६ पर्यंत घेतलेली कर्जं माफ होणार आहेत. “जून २०२६ हा शेतकऱ्यांसाठी सुवर्णमहिना ठरणार आहे, हे आम्हाला माहित आहे. जो समजेल, तो समजेल. पण आमचा निर्धार पक्का आहे,” असं ते म्हणाले.
सरकारवर दबाव आणण्याची रणनीती स्पष्ट करत कडूंनी सांगितलं की, “३० जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले पाहिजेत. त्यानंतरही सरकारने विलंब केला, तर आम्ही आणखी कठोर भूमिका घेऊ. आमच्या आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल केले, तरी आम्ही झुकणार नाही.”
बच्चू कडूंनी शेवटी फडणवीस सरकारला थेट इशारा दिला. “आम्ही अजून जिवंत आहोत आणि शेतकऱ्यांसाठी उभे आहोत. आमचा आवाज थांबवता येणार नाही. सरकारने ठरवलेली तारीख पाळली नाही, तर रस्त्यावरचा लढा आणखी उग्र होईल.
राज्यात आता शेतकऱ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला असून, बच्चू कडूंच्या या घोषणेमुळे राजकीय वातावरण अधिक तापलं आहे. सरकारकडून पुढील काही दिवसांत ठोस निर्णय न घेतल्यास, हे आंदोलन मोठ्या स्वरूपात पेट घेईल, अशी चिन्हं दिसत आहेत.








