नागपूर : नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर बुधवारी दुपारी वडांबा परिसरात झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. कार आणि ट्रॅव्हल बस यांच्यात झालेल्या समोरासमोरी धडकेत जबलपूर येथील प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. जबलपूरकडून नागपूरच्या दिशेने येत असलेली कार समोरून येणाऱ्या दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात विरुद्ध लेनमध्ये गेली आणि नागपूरकडून येणाऱ्या प्रवासी बसला जोरदार धडकली. या अपघातात कारचे तीनही प्रवासी घटनास्थळीच ठार झाले, तर आणखी एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे.
धडकेनंतर बस चालकाने गाडी वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र ती नियंत्रणाबाहेर जाऊन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला (आरजे ११/जीसी ६६६३) जाऊन धडकली. धडक एवढी जबरदस्त होती की कार अक्षरशः चक्काचूर झाली.
घटनेनंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. देवलापार पोलिस ठाण्याचे अधिकारी तसेच ओरिएंटल टोल प्लाझा खुमारी येथील कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह देवलापार ग्रामीण रुग्णालयात हलवले असून, अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
देवलापार पोलिसांनी या अपघाताचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.










