
मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) निवडणुकीला रंग चढत असताना राजकारण आणि क्रिकेट पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी सूचक टिप्पणी करत संपूर्ण वातावरणात हलचल निर्माण केली.
एमसीए अध्यक्षपदासाठी विद्यमान अध्यक्ष अजिंक्य नाईक पुन्हा रिंगणात आहेत, तर शिवसेना नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक यांचे नावही या स्पर्धेत चर्चेत आले आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, आशिष शेलार आणि प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयात बैठक घेतल्याचे वृत्त आहे.
याचवेळी, मुंबईतील विविध क्रिकेट क्लबचे सदस्य बुधवारी वाय. बी. चव्हाण सेंटर येथे शरद पवारांना भेटले. या सदस्यांनी “एमसीएच्या निवडणुकीत राजकारण नको, खेळाशी संबंधित व्यक्तीनेच अध्यक्ष व्हावे” अशी विनंती पवारांकडे केली. या भेटीस जितेंद्र आव्हाड आणि मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, “मी कधीही क्रिकेटमध्ये राजकारण आणलं नाही. आतापर्यंत कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी क्रिकेटमध्ये राजकारण केलं नाही आणि मला खात्री आहे की देवेंद्र फडणवीसही तसं करणार नाहीत. ते क्रिकेटच्या बाजूने उभे राहतील.”
त्यांनी पुढे म्हटलं, “क्रिकेटमधील राजकारण बाजूला ठेवणं गरजेचं आहे आणि फडणवीस याच दिशेने काम करत आहेत.” त्यांच्या या वक्तव्याला अजिंक्य नाईक यांच्या समर्थनाचा संकेत म्हणून पाहिले जात आहे.
दरम्यान, मंत्री प्रताप सरनाईक यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट दिली होती. त्यांनी ती भेट “दिवाळीच्या शुभेच्छांसाठी होती” असे सांगितले असले, तरी सूत्रांनुसार या भेटीत एमसीए निवडणुकीसंबंधी चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सध्या एमसीएच्या निवडणुकीत राजकारण विरुद्ध खेळ असा संघर्ष उभा राहिला असून, शरद पवारांच्या या सूचक वक्तव्यामुळे राजकीय समीकरणे अधिकच गुंतागुंतीची झाली आहेत.










