नागपूर : गेल्या महिनाभरात विमानांवर झालेल्या पक्षी धडकांच्या दोन घटनांनंतर नागपूर महानगरपालिका प्रशासनाने सजगता दाखवत लक्ष्मीनगर झोनमधील शास्त्री लेआउट परिसरातील चिकन मार्केटवर अतिक्रमणविरोधी मोहिम राबवली.
ही कारवाई दुपारी १२ ते सायं ६.३० वाजेपर्यंत करण्यात आली. या मोहिमेत झोन अधिकारी, मुख्य कार्यालयातील अभियंता श्री. माळवे यांच्यासह ६ कर्मचारी, १ JCB, १ ट्रक आणि NDS अधिकारी श्री. खांदरे यांचे सहा सदस्यीय पथक सहभागी झाले होते.
कारवाईदरम्यान १२ अवैध दुकाने, २ लोखंडी स्टँड आणि १ ट्रॅम्पोलिन जप्त करण्यात आले. मनपा अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, विमानतळ परिसरात कुक्कुटपालन आणि मांसविक्री केंद्रांमुळे पक्ष्यांची गर्दी वाढते, ज्यामुळे विमानांना उड्डाणावेळी धोका निर्माण होतो.
मनपा प्रशासनाने स्पष्ट केले की, विमानतळाच्या आसपास अशा प्रकारच्या व्यवसायांवर आणि अतिक्रमणावर कठोर कारवाई सुरूच राहील. तसेच नागरिकांनी सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने अशा ठिकाणी व्यावसायिक उपक्रम न सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.










