
जानेवारी ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत सायबर गुन्ह्यांतून १११ कोटी ९८ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. पोलिस, आयकर अधिकारी किंवा कस्टम अधिकारी असल्याचे सांगत गुन्हेगार फोन करून **‘डिजिटल अरेस्ट’**च्या नावाखाली नागरिकांना धमकावतात. या आठ महिन्यांत अशा २१८ गुन्ह्यांची नोंद झाली असून फक्त ४९ जणांना अटक झाली आहे. पोलिसांच्या तपासात आढळले की गुन्हेगार सोशल मीडियावरील माहिती, बँक खात्याचे तपशील आणि ओटीपीचा गैरवापर करून लोकांना लाखोंनी गंडवतात.
राज्यातील सायबर विभागाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत ५,३०९ सायबर गुन्ह्यांपैकी १,२०० प्रकरणांचा तपास पूर्ण झाला असून १०३० आरोपींना गजाआड करण्यात आले आहे. मात्र, २०२० ते २०२३ दरम्यानच्या ६१ हजारांहून अधिक गुन्ह्यांचा तपास अजून बाकी आहे.
सायबर गुन्हे टाळण्यासाठी नागरिकांनी घ्यावी खबरदारी-
महाराष्ट्र सायबरचे उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. गुन्हेगार विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि डिजिटल माहिती नसलेल्या लोकांना लक्ष्य करतात.
हॅकिंग झाल्यास काय कराल-
- व्हॉट्सअॅप लगेच अनइंस्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल करा.
- ओटीपी, व्हेरिफिकेशन कोड किंवा गुगल कोड कोणालाही देऊ नका.
- टू-स्टेप व्हेरिफिकेशन सक्रिय करा.
- संशयास्पद कॉल किंवा मेसेजला प्रतिसाद देऊ नका.
- आपले संपर्क व्यक्ती त्वरित सावध करा.
फसवणुकीचा बळी ठरल्यास लगेच राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन १९३० वर कॉल करा किंवा www.cybercrime.gov.in वर ऑनलाइन तक्रार नोंदवा.
डिजिटल युगात सुरक्षित राहायचं असेल तर तंत्रज्ञानाचा वापर समजून आणि सजगतेने करणं हीच काळाची मागणी आहे.









